Nagar : पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरविण्याकरिता ५३ कोटींची मंजुरी

नेवासा : तालुक्यातील सन १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरविण्याकरिता २६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटींची मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनााबाबत आमदार लंघे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी केली होती. नेवासा मतदार संघातील पुनर्वसित गावांचे परत मूल्यमापन करून कृती आराखडा तयार करावा, यासाठी मागणी केली होती. सुरुवातीला हा आराखडा तयार केला, त्यावेळी ५० वर्षापूर्वीच्या पुनर्वसित गावांना वगळण्यात यावे, असा निर्णय होणार होता.
याबाबत आमदार लंघे यांनी वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन १९७६ पूर्वीच्या गावांना यातून वगळू नये, अशी मागणी केली. याची दाखल घेत हा आराखडा दुरुस्त करून १९७६ पूर्वीच्या गावांचा यात समावेश करण्यात आला. यामुळे २६ गावांत अपूर्ण असलेल्या सर्व नागरी सुविधाची कामे पूर्ण होणार आहेत. अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पथदिवे यांचा यात समावेश असणार आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे १९७६ पूर्वीच्या गावाचा कृती आराखड्यात समावेश बहिरवाडी, फत्तेपूर, प्रवरासंगम, खलाल पिंपरी, बकूपिंपळगाव, मंगळापूर, खेडले काजळी, तरवडी ,उस्थळ दुमला, भालगाव, धामोरी, गळनिंब, गोपाळपूर, रामडोह, सुरेगाव गंगा, जैनपूर,रामडोह,सुरेगाव दही, खामगाव, वरखेड, उस्थळ खालसा,बेलपांढरी,बोरगाव,बोधेगाव या गावांचा समावेश आहे.





