Nagar : कामात हलगर्जीपणा झाल्यास अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई

पाथर्डी : पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील योजनेमधील अपूर्ण पाण्याच्या टाक्या, अपूर्ण पाईपलाईन, जलशुध्दीकरण केंद्र, जॅकवेल व वितरण पाईपलाईन या बाबतच्या अडचणी व दिरंगाईबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतला.
यामध्ये पाण्याच्या टाक्यासाठी शासकीय जागा मिळत नसल्याबाबतची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मकतेने लक्ष घालून सोडवावी. तसेच रेट्रोफिटींगच्या शहरटाकळी व बोधेगाव योजना एप्रिल अखेर पूर्ण करून घेण्याचे आदेश संबधीत अधिकाऱ्यांना दिले. याबाबत कामात हलगर्जीपणा झाल्यास अधिकारी व कंत्राटदार यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.
पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील अत्यंत जिव्हाळयाचा विषय असलेल्या भगवानगड परिसर 43 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बोधेगाव व इतर 7 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, शहरटाकळी व इतर 24 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, अमरापूर-माळीबाभूळगाव इतर 50 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे संथगतीने सुरू आहेत. योजनेमधील अडचणी दूर करून कामे तत्काळ पूर्ण होण्यासाठी आ. मोनिका राजळे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे दालनात सर्व अधिकारी यांचेसह आढावा बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी संबधीत सर्व पाणी पुरवठा योजनांचे अधिकारी, अहिल्यानगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रधान सचिव, पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व अधिकारी यांचेसह मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात बैठक पार पडली.
या आढावा बैठकीत पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आ. मोनिका राजळे, पाणी पुरवठा प्रधान सचिव संजय खंदारे, सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशांत भामरे, अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे, कार्यकारी अभियंता मृणाल धगधगे, कार्यकारी अभियंता जि.प. हितेंद्र चव्हाण व दूरदृष्टय प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.





