Nagar : दुहेरी हत्याकांडातील दोघा आरोपींविरोधात मोका अंतर्गत कारवाई

शिर्डी : येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीविरोधात मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली असून, ही कारवाई पोलिसांनी तत्काळ केल्यामुळे पोलिसांच्या या निर्णयाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दि. ३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास साई संस्थानमधील कर्मचारी सुभाष साहेबराव घोडे व नितीन शेजुळ हे साईबाबा संस्थान येथे ड्यूटीला जात असताना दोन आरोपींनी लूटमार करण्याचे उद्देशाने त्यांची मोटार सायकल वेगवेगळ्या ठिकाणी अडवून त्यांचा खून केला होता.
या घटनेबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. गुन्ह्याच्या तपासात सदरचा गुन्हा हा आरोपी राजू उर्फ शाक्या अशोक माळी व आरोपी किरण ज्ञानदेव सदाफुले यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. या दोघा आरोपींवरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधील वाढीव कलम लावण्याची परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांना गुन्ह्याचे तपास अधिकारी रणजित गलांडे यांनी सादर केला होता.
त्याप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांनी आरोपी राजु उर्फ शाक्या अशोक माळी व किरण ज्ञानदेव सदाफुले यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(i), ३(२) व ३(४) असे वाढीव कलम लावण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणे सदरचे गुन्ह्यास 6 मार्च रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधील वाढीव कलम लावलेले आहे.





