Nagar: श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यात वाळू तस्करांवर कारवाई

अहिल्यानगर : श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यात वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली. चार ठिकाणी कारवाई करत वाळूसह ४०.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात तीन, तर शेवगाव पोलिस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १५ आरोपींचा समावेश आहे.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाला अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील कार्यरत परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रॉबीन बन्सल, श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकले.
वाळू, गाड्या असा ४०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून यात १५ आरोपींचा समावेश आहे.





