Nagar : मातुलठाण परिसरात अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई

श्रीरामपूर : तालुक्यातील मातुलठाण परिसरात पोलीस प्रशासनाने अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपशाविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत आठ ट्रॅक्टर, एक जेसीबी मशिनसह 54 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात वाळू उपशाविरोधात मोठी कारवाई झाल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
8 एप्रिल रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना गुप्त बातमीदारामार्फत मातुलठाण शिवारात गोदावरी नदीपात्रातून काही इसम ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरून अवैधरित्या वाळू वाहतूक करणार असल्याबाबतची माहिती मिळाली.
त्यानुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे परि. पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस नाईक सचिन धनाड, रामेश्वर वेताळ, सुनील दिघे तसेच तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सतीश डौले, संदीप मुरकुटे, पोलीस हवालदार प्रशांत रणनवरे, विनोद कुदनर यांचे पथक तयार करून मातुलठाण येथे रवाना झाले. मातुलठाण शिवारात पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहिती प्रमाणे काही इसम ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने गोदावरी नदीपात्रातून वाळूचा चोरून उपसा करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सदर ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी एक जेसीबी, आठ ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळूने भरलेले व दोन मोटारसायकली याप्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस पथकाची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर व जेसीबीवरील ड्रायव्हर साधने नदीपात्रात सोडून पळून जाऊ लागले. परंतु, पोलीस पथकाने त्यातील तीन ट्रॅक्टरवरील ड्रायव्हर व एक जेसीबी चालक अशा चार जणांना ताब्यात घेतले.
त्यांना त्यांची नावे विचारली असता आकाश अभिमन्यू ठोंबरे (वय 20, रा. पुरणगाव), अतीश दत्तु रोठे (वय 20 रा. हिंगोणी, ता. वैजापूर), गणेश कैलास पवार (वय 24 रा. लाखगंगा) व एक जेसीबी चालक सुमित धर्मराज ठोंबरे (वय 19, रा. पुरणगाव) असे सांगितले. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व तालुका पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत 54 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार शंकर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 303(2), 3(5) सह पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





