खेड : बारामती-अमरापूर राज्यमार्गावर खेड (ता.कर्जत) येथे लोकनायक विद्यालयाच्या परिसरात टाकण्यात आलेल्या गतीरोधकावर रोज रात्री-अपरात्री मोठ-मोठे अपघात होत आहेत. या अपघातात आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकजण रोज जखमी होत आहेत. त्यामुळे हा गतिरोधक काढून टाकावा नाहीतर या गतीरोधकावर परावर्तक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी केली आहे. राज्यमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले खरे,परंतु या गतीरोधकांवर गडद पांढरे पट्टे आणि परावर्तक बसवण्याचे महत्वपूर्ण काम सार्वजनिक बांधकाम विभाग विसरला. त्यामुळे रामभरोसे सुरूअसलेल्या वाहतुकीकडे कुणीच गांभीर्याने पाहिले नाही. या रस्त्यावर शेकडो अपघाताच्या मालिका घडल्या. सध्याही या गतिरोधकावर दैनंदिन मोठे अपघात होत आहेत. लोकनायक शाळेच्या परिसरात टाकण्यात आलेला गतिरोधक हा उतारावर असल्याने येणारी वाहने ही खूपच जलदगतीने येतात. गतिरोधकाच्या जवळ येईपर्यंत वाहनचालकांना गतिरोधक दिसत नाही आणि अचानक गतिरोधक दिसल्याने वाहने मोठयाने ब्रेक दाबतात. त्यामुळे वाहनांच्या पाठीमागे असलेल्या अनेक वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने एकमेकांवर चढून मोठे अपघात होतात.अपघातांची संख्या इतकी वाढली आहे की, या ठिकाणी सतत रक्ताचे सडे पडल्याचे विदारक आणि दुखद चित्र दिसते. लोकनायक शाळा जेव्हा विद्यार्थ्यानी भरलेली असते, तेंव्हा रुग्ण घेऊन जाणार्या रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज वारंवार विद्यार्थ्यांच्या कानावर पडतो. गतिरोधक टाकलेला रस्ता हा खूपच उताराचा आहे. या गतिरोधकावर परावर्तक नसल्याने गतीने आलेल्या वाहनांना अजिबात अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी रोज अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे गतिरोधक काढावेत किंवा परावर्तक बसवण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल. -विलास नलगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, लोकनायक विद्यालय ‘पुढे शाळा आहे’ असा फलकही नाही! खेड येथील राज्यमार्गालगत असलेल्या लोकनायक विद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र जीव मुठीत घेऊन त्यांना रस्ता ओलांडून जावे लागते. रस्ता उताराचा असल्याने वाहने गतीने येतात. नवख्या वाहनांना पुढे शाळा असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सा.बां.विभागाने पुढे शाळा आहे, असा फलक लावणे गरजेचे आहे.