फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत नदालच विजेता

पॅरिस – लाल मातीवर आपणच अनभिषिक्त सम्राट आहोत याचा प्रत्यय घडवित रॅफेल नदाल याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत बाराव्या विजेतेपदावर मोहोर चढविली. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत ऑस्ट्रियन खेळाडू डॉमिनिक थिम याला 6-3, 5-7, 6-1, 6-1 असे पराभूत केले. हा सामना तीन तास चालला.
विजेतेपदासाठी नदाल याचे पारडे जड होते. त्याने उपांत्य फेरीत रॉजर फेडरर या तुल्यबळ खेळाडूचा सरळ तीन सेट्समध्ये धुव्वा उडविला होता. थिम याने अंतिम फेरीत स्थान मिळविताना अग्रमानांकित नोवाक जोकोव्हिच याला गारद केले होते. अंतिम सामन्यातील दुसऱ्या सेटचा अपवाद वगळता या लढतीत नदाल यानेच वर्चस्व राखले होते.
नदाल याने पहिल्यांदा 2005 मध्ये येथे अजिंक्यपद मिळविले होते. त्यानंतर त्याने 2008 पर्यंत विजेतेपद राखले. पुन्हा त्याने 2010 ते 2014, तसेच 2017 व 2018 मध्ये हा किताब मिळविला होता. त्याखेरीज त्याने ऑस्ट्रेलियन ( 2009 ), विम्बल्डन (2008 व 2010 ), अमेरिकन (2010, 2013 व 2017) या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. 2008 मध्ये त्याने ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.





