Myra Vaikul : छोटी मायरा वायकुळ झळकणार ‘या’ चित्रपटात, पोस्टर आले समोर

Myra Vaikul New Movie: टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेली बालकलाकार मायरा वायकुळ लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. मायराचा नवीन चित्रपट ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. यानिमित्ताने मायराने श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. तसेच, यावेळी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
मायराची भूमिका असलेला ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट 31 जानेवारी 2025 ला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. या चित्रपटात मायरासोबतच कल्याणी मुळ्ये, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर आणि रेशम श्रीवर्धनकर या कलाकारांनी देखील भूमिका साकारली आहे.
31 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत माने यांनी केले आहे. तर पटकथालेखन संकेत माने, सुमित गिरी यांनी केले आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाचे निर्माते आहेत. तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. किमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओजद्वारे चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मायराच्या कामाबद्दल सांगायचे तर यापूर्वी तिने अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासोबत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम केले आहे. तसेच, यापूर्वी ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत देखील झळकली होती.





