Myanmar News : म्यानमारमध्ये स्फोटकांच्या गोदामात भीषण स्फोट, 45 जणांचा मृत्यू
म्यानमारच्या (Myanmar News) इशान्येकडील भागात एका स्फोटकांच्या गोदामामध्ये रविवारी झालेल्या भीषण स्फोटात किमान ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Myanmar News : म्यानमारच्या (Myanmar News) इशान्येकडील भागात एका स्फोटकांच्या गोदामामध्ये रविवारी झालेल्या भीषण स्फोटात किमान ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. खाण उद्योगासाठी वापरण्यात येणारी स्फोटके या गोदामामध्ये साठवून ठेवण्यात आली होती, असे बचाव पथकाने आणि म्यानमारमधील तटस्थ माध्यमांनी म्हटले आहे.
या स्फोटामध्ये (Myanmar News) किमान अन्य ७० जण जखमी झाले आहेत. नामकाम शहरातल्या कौंगतप गावामध्ये रविवारी दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला. हा भाग म्यानमारला लागून असलेल्या चीनच्या सीमेच्या ३ किलोमीटर दक्षिणेला आहे.
स्फोटाची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली असून रविवार संध्याकाळपर्यंत ६ लहान मुलांसह ४६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. जखमी झालेल्या ७४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे, असे बचाव अधिकाऱ्याने सांगितले. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील किमान १०० घरांचे नुकसान झाले आहे.
स्फोटात (Myanmar News) मरण पावणाऱ्यांची संख्या ५० ते ५५ इतकी असावी, असा अंदाज शान प्रांतातील सरकारी वृत्तसंस्थेबरोबर अन्य काही वृत्तसंस्थांनी वर्तवला आहे. मृतांचा आकडा खूप जास्त असावा, असा अंदाज चिनी वृत्तसंस्थेनेही वर्तवला असून अनेक घरांची पडझड झाल्याचेही चिनी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
स्थानिक प्रशासन सध्या बाधित रहिवाशांना मदत, वैद्यकीय सेवा आणि पुनर्वसन सहाय्य पुरवत आहेत.खाणकाम आणि खडक फोडण्यासाठी जेलिग्नाइटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण त्याचीयोग्य प्रकारे साठवणूक केली नाही, तर ते घातक ठरू शकते.
बंडखोरांच्या संघटनेचे नियंत्रण…
स्फोट झालेल्या या भागावर तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र वांशिक गटाचे नियंत्रण आहे. या गटाचा म्यानमारमधील सरकारी सैन्यदलाशी दीर्घकाळापासून सशस्त्र संघर्ष सुरू आहे. या स्फोटामागील कारणांचा शोध घेतला जात आहे, असे तांग नॅशनल लिबरेशन आर्मीने म्हटले आहे. टीएनएलए ही बंडखोरांच्या थ्री ब्रदरहूड अलायन्स आघाडीची सदस्य संघटना असून आहे.
२०२३ च्या अखेरीस म्यानमारच्या लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अधिक स्वायत्तता मिळवण्यासाठी बंडखोरांची ही संघटना सरकारी सैन्याशी संघर्ष करत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर टीएनएलएने म्यानमारच्या लष्करासोबत शस्त्रसंधीवर स्वाक्षरी केली, परंतु त्यांच्यातील संबंध अजूनही तणावपूर्ण आहेत.






