‘माझ्या मुलाने काही प्रकार केलेला नाही’ बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा ‘दावा’

Badlapur School Girl Rape Case । बदलापूरमधून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. बदलापूरमधील एका शाळेत लहान मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचे समोर आले. या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटले असून रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक तासांपासून रेल्वे रोको सुरू आहे. आरोपीला इथेच फाशी द्या अशी मागणी करत आंदोलकानी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पीडित मुलींनी पालकांना जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली. यानंतर पालकांनी शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला या संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर पीडित मुलींची खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर पीडित मुलींचे पालक या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनीही त्यांची तातडीने दखल घेतली नाही.
१२ तास त्यांना रखडत ठेवण्यात आले आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरदेखील कारवाई केली. तसेच या प्रकरणातील संबंधितांना निलंबित करण्यात आले असून, आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ‘अक्षय शिंदे’ असं या आरोपीचं नाव आहे.
आता आरोपी अक्षय शिंदेने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. आता अक्षय शिंदेच्या वडिलांनी या सर्व आरोपांना फेटाळत अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
अक्षयचे आई वडील माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’अक्षयला फक्त १५ दिवस झाले होते शाळेत कामाला लागून, १७ तारखेला त्याला पोलिसांनी धरलं. अक्षयला धरुन नेलं इतकंच आम्हाला सांगण्यात आलं. पोलिसांनी अक्षयला मारहाण केली. माझ्या लहान मुलालाही पोलिसांनी मारलं. चौकीत गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की, तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे. अक्षय फक्त ११ वाजता बाथरुम धुवायला जात होता. बाकी कुठलंही काम दिलेलं नव्हतं. त्यानंतर शाळेत झाडू मारायचा. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की झाडू मारायला जायचो. आमचं सगळं कुटुंबच तिथे कामाला होतं. माझ्या मुलाने हा काही प्रकार केलेला नाही.’ असेही ते म्हणाले आहे.
कोण आहे अक्षय शिंदे?
आरोपी अक्षय शिंदेने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. ज्या शाळेत ही घटना घडली, ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे.
या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुवादित तर तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विनानुदानित आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण १२०० च्या आसपास आहे.
आरोपी अक्षय शिंदेकडे काय जबाबदारी होती?
या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता. त्याचे वय २४ वर्षे आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊ जाण्याची जबाबदारी देण्यात आली.
लैंगिक अत्याचाराचा प्रकार कधी समोर आला?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाकडून अत्याचार करण्यात आला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.
या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली दखल
बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. तर शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक महाराष्ट्रात येणार
या प्रकरणाची राष्ट्रीय बालक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून एक पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने सांगितले आहे.
केंद्र सरकारने निर्मित केलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी आयोगाकडून एक तपास पथक बदलापूर येथे पाठवण्यात येणार आहे. हे पथक या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करेल. तसेच पोलिसांनी पीडितेच्या पालकांना तक्रार नोंदवण्यासाठी 12 तास थांबवले, ही धक्कादायक बाब आहे.
याप्रकरणी राज्य शासनाकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या या समितीवर माझेही लक्ष असेल.
तसेच याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्व दोषी पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा होईल. त्यासोबतच याप्रकरणाची सखोल चौकशी आम्ही देखील करणार असल्याची माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे.





