राजगुरूनगर (प्रतिनिधी) – पूर्वी जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नेतृत्व शरद पवार करीत होते. महाराष्ट्रासह जिल्ह्याचा त्यांनी विकास केला तेच आता अजित पवार करीत आहेत. पवारांचे आशीर्वाद पाहिजेत मात्र आता पुणे जिल्हा मोठा झाला आहे. तो कोण चालवणार? त्यासाठी त्या ताकदीचा नेता असला तर त्या जिल्ह्याचा विकास होतो. म्हणून अजित पवार यांचे नेतृत्व पाहिजे आहे, माझे राजकारण अजित दादांनी घडवले असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रे निमित्ताने राजगुरूनगर येथे महिलांचा मेळावा झाला, त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मोहिते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री तथा खासदार सुनील तटकरे, प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी सदस्या सुरेखा मोहिते पाटील, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, बाबा राक्षे, जयसिंग दरेकर, सागर सातकर, सिद्धार्थ कांबळे, सुभाष होले यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील महिला, युवक, नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार मोहिते पाटील म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात पक्षात काही बदल झाले. आम्ही दादा सोबत गेलो. सगळ्यांना कल्पना आहे अजित पवारांमुळे खेड तालुक्याच्या विकास झाला. अजित पवार यांनी खेड तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. रस्ते, शासकीय इमारती, पूल बांधले म्हणजे विकास झाला का? तर होय, यालाच विकास म्हणतात खेड तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सव्वाचार हजार कोटींची पाच वर्षांची कामे झाली आहेत, असे त्यांनी नमूद केले.