Priya Berde : “माझ्या दंडाला चिमटे काढले… हातातल्या अंगठ्या काढण्याचा प्रयत्न…”; अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी सांगितला चाहत्यांचा धक्कादायक अनुभव

Priya Berde : सध्या सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक वृद्ध महिला फोटो काढण्यासाठी त्यांच्याकडे जातात पण या महिलेचा हात झिडकारून जया या रागातून व्हिडीओत दिसत आहे.
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्या वर्तुवणुकीवर संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी त्यांच्या कृतीला पाठिंबा दर्शविला आहे. अशातच आता मराठमोळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी एका चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
जया बच्चन यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या खाली अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी कमेंट करत त्यांना चाहत्यांचा आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीने सांगितलं की आता चाहत्यांना सेल्फीसाठी सरळ नकार देते किंवा फोटो काढायचा आहे ना मग अंतर ठेवून काढा, असं सरळ सांगते. कुणाला राग आला तरी चालेल असं अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.
हे सगळं जाम डोक्यात जातं
खरं आहे असे अनेक अनुभव येतात. पण समजून कोण घेणार गं? मी अशाच एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले होते. तिथे बायकांनी माझे गाल ओढले. माझ्या दंडाला चिमटे काढले. माझ्याशी हात मिळवून माझ्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न केला. खूप भीषण अनुभव आल्याचं त्यांनी कमेंटद्वारे सांगितलं आहे.
राग आला तर येऊ दे.
पुढे त्या म्हणाल्या, काही बायकांना खांद्यावर हात टाकून फोटो काढायचा असतो. कमरेत हात घालून फोटो काढायचा असतो. हे सगळं जाम डोक्यात जातं. पण, मी आता ठामपणे नाही म्हणून सांगते. फोटो काढा पण एक अंतर ठेवून. राग आला तर येऊ दे. प्रिया बेर्डेंच्या कमेंटवर सेलिब्रेटींनी आपले अनुभवही शेअर केले आहेत.





