नवी दिल्ली : काँग्रेसजन आपल्याला ठार मारण्याचे स्वप्न बघत असल्याचे धक्कादायक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परंतु, सारे देशवासीय माझ्या पाठिशी आहेत याचा काँग्रेसला विसर पडला आहे, असेही मोदी म्हणाले. मध्यप्रदेशच्या इटारसी येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी भाषण केले.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस नेते माझा खूप तिरस्कार करतात. त्यांना मला ठार मारण्याची इच्छा आहे. ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षांतील अनेकांना पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र त्यापैकी कोणाचीही विरोधी पक्षनेताही बनण्याची क्षमता नव्हती. एका कुटुंबाची ५५ वर्षांची सत्ता विरुद्ध ‘चहावाल्या’ची ५५ महिन्यांची सत्ता यातील योग्य काय आहे, हे नीट पारखून एकाची निवड करा, असे आवाहन मोदी यांनी उपस्थितांना केले.