Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मतभेद उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना (ठाकरे गट) कडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra Politics) सुरुवातीला महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली. दानवे हे ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. (Maharashtra Politics) दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही मोठी घोषणा करत या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच हर्षवर्धन सपकाळ यांची नावे चर्चेत आहेत. (Maharashtra Politics) विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता, महाविकास आघाडीला ९ पैकी एक जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजप ५, शिवसेना (शिंदे गट) २ आणि अजित पवार गट १ जागा जिंकू शकतो, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील ९ विधान परिषद जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल असून ४ मे ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. (Maharashtra Politics)