नवी दिल्ली – गुंतवणूकदारांची आर्थिक साक्षरता वाढत आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीचे नवे पर्याय उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत भारतातील म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 2035 पर्यंत वाढवून 300 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. बेन अँड कंपनी व ग्रो या इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने केलेल्या विश्लेषणानुसार डिजिटल माध्यमातून गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या शहरातीलच नाही तर छोट्या शहरातील गुंतवणूकदार फंडात गुंतवणूक वाढविण्याची शक्यता आहे. सध्या भारतातील दहा टक्के कुटुंबाकडून म्युच्युअल फंडात गुंतवणूक होत आहे. पुढील दशकात हे प्रमाण वाढून 20% होण्याची शक्यता असल्याचा दावा अहवालात करण्यात आला. सरकारला याची जाणीव असून या क्षेत्रात पारदर्शकता वाढावी आणि गुंतवणूक सुलभ व्हावी या दृष्टिकोनातून संबंधित संस्था योग्य प्रकारे काम करीत आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या मानसिकतेऐवजी दीर्घ पल्ल्यचा विचार करून गुंतवणूक करणार्यांची संख्या आगामी काळात वाढणार असल्याचे हे नमूद करण्यात आले. फ्युचर अँड ऑप्शनमधील जोखमीची गुंतवणूक न करता गुंतवणूकदारांनी अधिक पारदर्शक वित्तीय साधनात गुंतवणूक करावी यासाठी बाजार नियंत्रक सेबी आवश्यक नियमावली तयार करून राबवीत आहे. अशा परिस्थितीत रिटेल गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे तरुण गुंतवणूकदारांची वेगाने संख्या वाढत असून सध्या नऊ कोटी तरुण गुंतवणूकदार डिजिटल सुविधामुळे आणि आर्थिक साक्षरतेमुळे गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. 93% गुंतवणूकदारांना तोटा 2022 ते 24 दरम्यान भारतात फ्युचर अँड ऑप्शन क्षेत्रात गुंतवणूक करणार्या एकूण गुंतवणूकदारांपैकी 93 टक्के गुंतवणूकदारांना तोटा झाला असल्याची धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी पूर्ण ज्ञान असल्याशिवाय गुंतवणूक करू नये असा सल्ला शेअर बाजार आणि सेबी वेळोवेळी ग्राहकांना देत आहे. बचतीऐवजी गुंतवणूकदार आता वित्तीय साधनाकडे वळत आहेत. मात्र या गुंतवणूकदाराने डोळसपणे विचार करून गुंतवणूक करत राहण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.