पिंपरी – बर्ड फ्ल्यूच्या धास्तीने खवय्यांकडून चिकन व अंड्यांना मागणी कमी झाली आहे. परंतु मांसाहारीप्रेमींनी आपला मोर्चा आता मटन, मासळी व सुक्या मासळीकडे वळविला आहे. तर मागणी वाढल्याने मासळीचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळीच मटन व मासळी खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत दिसून आले. राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका निर्माण झाला होता. तरीदेखील पुणे जिल्ह्यात एकही केस आढळली नव्हती. चार दिवसांपूर्वी असलेल्या परिस्थितीत बदल झाला. मुळशी तालुक्यात बर्ड फ्ल्यूने बाधित मृत कोंबड्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळशी तालुक्यातील हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आता बर्ड फ्ल्यूची धास्थी जाणवू लागल्याचे चित्र आहे. अन्य दिवसांच्या तुलनेत रविवारी मांसाहाराला अधिक मागणी असते. त्यातल्या त्यात खाद्यप्रेमींकडून चिकनला मोठी मागणी असते. मात्र, आज चिकनकडे खाद्यप्रेमींनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसले. एरव्ही दर रविवारी सकाळपासून चिकनविक्रीच्या दुकानासामोर गर्दी करणारे खाद्यप्रेमी चिकन विकत घेण्यासाठी अभावाने दिसत होते. तर मटन, मासळी व सुक्या मासळीला मागणी वाढल्याचे चित्र होते. शहरातील मटन व मासळी विक्री केंद्रांवर खाद्यप्रेमींनी गर्दी केली होती. मासळीच्या भावात वाढ गेली काही दिवसांपासून मागणी घटू लागल्याने चिकन व अंड्यांच्या दरात घट होत आहे. तर मासळीला मागणी वाढू लागली असून, पुरवठा स्थिर असल्याने मासळीच्या दरात वीस ते तीस टक्के वाढ झाली आहे. याशिवाय सुक्या मासळीलादेखील मागणी वाढली आहे. तर मटनाचे दर मात्र स्थिर आहेत.