खोडद -लॉकडाऊन सुरू होऊन 1 महिना उलटून गेला आहे. सध्या मटन व चिकनचे भाव कडाडले असल्याने ज्यांच्याकडे कोंबड्या शिलक आहेत, अशा लोकांच्या पोल्ट्री व्यवसायाला चांगले दिवस येऊन चिकन दुकानवाल्यांची चलती दिसून येत आहे.
लॉकडाऊनपूर्वी मटनाचे भाव 500 व चिकनचे भाव 30 रुपये किलोप्रमाणे होते. काही ठिकाणी तर कोंबड्या फुकट देण्याची वेळ पोट्री व्यवसायिकांवर आली होती; परंतु लॉकडाऊननंतर चिकनला मागणी वाढली. अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी आपल्या पोल्ट्रीत नवीन कोंबड्या (पिल्ले) न टाकल्याने बाजारात ब्रॉयलर कोंबड्यांची कमतरता पडल्याने कोंबड्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
सध्या चिकनचे भाव 200 ते 220 रुपये प्रती किलो व मटणाचे भाव 600 ते 650 प्रती किलो झालेले आहेत. जुन्नर तालुक्यात शेकडो तरुण वर्ग पोल्ट्री व्यवसायात उतरला असून तालुक्यात 500 ते 700च्या दरम्यान पोल्ट्य्रा आहेत. काही महिन्यांपूर्वी ब्रॉयलर कोंबड्यांमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढतो, या अफवेमुळे कोंबडीला मागणी नसल्यामुळे काही पोल्ट्री फार्म बंद आहेत.
सुमारे 50 टक्के पोल्ट्री फार्म बंद झाल्यामुळे मालाचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पशुसंवर्धन विभागाने ब्रॉयलर कोंबडीचे चिकन आणि करोना विषाणूचा कसलाही संबंध नसल्याचे परिपत्रक जरी केले होते.
त्यामुळे नागरिकांचा मांसाहार करण्याकडे कल वाढू लागला आहे. आता लॉकडाऊनमुळे बहुतांशी गावामध्ये चिकन, मटनाची दुकाने ठराविक वेळेत सुरु आहेत. चिकन व्यावसायिक फोनद्वारे ऑर्डर घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी घरपोच डिलिव्हरी सेवा उपलब्ध आहे.
आर्थिक नुकसान भरून निघेल
लॉकडाऊन होण्याच्या काळापूर्वी ग्राहकांकडून ब्रॉयलर कोंबडीला मागणी नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी मोठ्या आर्थिक नुकसानात सापडले होते. आता कोंबडीचे दर वाढत असल्याने शेतकरी आर्थिक नुकसान थोड्या फार प्रमाणात भरून निघण्यास मदत होणार आहे. अशी माहिती येथील पोल्ट्रीधारक प्रतिक मुळे, इस्माईल सय्यद व गणेश पवार यांनी दिली.