दिल्लीतील मुस्तफाबाद होणार ‘शिव विहार’ ; नाव बदलासाठी मोहन बिष्ट आज विधानसभेत प्रस्ताव मांडणार

Mustafabad Name Change । दिल्लीमध्ये मुस्लिमांची दाट वस्ती असलेल्या मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघाला नवीन नाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुस्तफाबादचे नाव बदलून शिव विहार असे ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत, सत्ताधारी भाजप आमदार मोहन सिंह बिष्ट आज दिल्ली विधानसभेत नाव बदलाचा प्रस्ताव मांडणार आहेत.
विधानसभेत चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अजेंड्यानुसार, विधानसभेचे उपाध्यक्ष मोहन सिंग बिष्ट खाजगी सदस्याचा प्रस्ताव मांडतील. मतदारसंघातील मतदारांच्या भावना लक्षात घेऊन मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघाचे नाव ‘शिव विहार’ विधानसभा मतदारसंघ असे बदलले जाऊ शकते.
निवडणूक प्रचारादरम्यान नाव बदलण्याचे आश्वासन Mustafabad Name Change ।
फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोहन सिंग बिष्ट यांनी म्हटले होते की मुस्ताबादमध्ये हिंदूंची संख्या मोठी आहे, ज्यांना त्याचे नाव बदलून शिव विहार किंवा शिव पुरी करायचे आहे. त्यांनी सांगितले होते की दिल्लीत आमचे सरकार स्थापन होताच या ठिकाणाचे नाव बदलले जाईल. मुस्ताबाद हे ईशान्य दिल्लीत आहे, जिथे फेब्रुवारी २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच भीषण जातीय हिंसाचार झाला होता, ज्यामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
मोहन बिष्ट मुस्तफाबाद मतदारसंघातून विजयी Mustafabad Name Change ।
दिल्ली दंगलीतील आरोपी आणि आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन हे मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातून मोहन बिष्ट यांच्या विरोधात एआयएमआयएमचे उमेदवार होते. त्यांनी निवडणूक लढवल्यामुळे ही स्पर्धा त्रिकोणी बनली होती. ६७ वर्षीय मोहन बिष्ट यांनी ही जागा जिंकली आहे.
मोहन सिंग बिश्त १९९३ मध्ये शेजारच्या करवाल नगर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागा जिंकून भाजपने दिल्लीत पुन्हा सत्ता मिळवली. २०१३ पासून दिल्लीत वर्चस्व गाजवणाऱ्या ‘आप’ला फक्त २२ जागांसह विरोधी पक्षात बसावे लागले.





