मुस्लीम समाजाने राजकीय अस्तित्व निर्माण करावे – प्रकाश आंबेडकर

पिंपरी – मुस्लीम समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यांची सुरक्षितता हा मुद्दा प्रामुख्याने पुढे येत आहे. एनआरसी, सीएए यांसारख्या कायद्यांच्या मध्यमातून त्यांच्या नागरिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न होत आहे. स्थानिक पातळीवर मुस्लिमांचे अनेक प्रश्न आहेत. मुस्लीम बांधवानी आपले हक्क, अधिकार मिळविण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मुस्लीम समाजाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक प्रश्नांविषयी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ऍड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, केंद्र सरकार विरोधकांना विविध केंद्रीय यंत्रणेद्वारे संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या रडारवर आहेत. समाजातील न्यायासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या कर्तृत्ववान मुस्लीम तरुणांना पुढे आणून त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी.
अशा तरुणांच्या पाठीशी आम्ही आपली ताकद उभी करून परिवर्तन घडवू. सिद्दीक शेख, हाजी गुलजार शेख, अमीर हमजा शेख, मौलाना अकबर मिल्ली, हाजी गुलाम रसूल, कारी इकबाल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड फारुख शेख, हाजीमलंग शेख, तहसीन खान आदींनी सहकार्य केले.





