Murlidhar Mohol : अनेक विमानप्रवासी ब्लॅक लिस्टमध्ये; मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : मंगळवारी केंद्र सरकारने सांगितले की, या वर्षी ३० जुलैपर्यंत ४८ प्रवाशांना ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात आले आहे. म्हणजेच आता हे प्रवासी कोणत्याही प्रकारच्या विमानात प्रवास करू शकत नाहीत. नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. गेल्या काही वर्षांतही अशा प्रवाशांची मोठी संख्या या यादीत टाकण्यात आली होती.
त्यावेळी २०२४ मध्ये ८२ प्रवाशांना आणि २०२३ मध्ये ११० प्रवाशांना बंदी घालण्यात आली होती. विमानातील अनुशासनहीन किंवा हिंसक वर्तनामुळे ही कारवाई केली जाते. डीजीसीएच्या नियमांनुसार, प्रवाशांचे गैरवर्तन तीन पातळ्यांवर वर्गीकृत केले जाते. यामध्ये काही प्रकारचे स्तर आहेत, एक पातळी म्हणजे असे वर्तन की मोठ्याने बोलणे. यासाठी तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात येते. दुसऱ्या पातळ्यावर शारीरिक किंवा अपमानास्पद वर्तन. याअंतर्गत सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात येते. तिसऱ्या पातळीमध्ये गंभीर हिंसाचार किंवा धमकीच्या आधारावर किमान २ वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी बंदी घातली जाते.
६ विमान इंजिनमध्ये बिघाड
यासोबतच, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने माहिती दिली आहे की २०२५ मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत विमान इंजिन बंद पडण्याच्या ६ घटना आणि ३ वेळा ‘मेडे कॉल’ झाल्याची घटना घडली आहे. ही माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत दिली. मंत्रालयाने सांगितले की इंडिगो आणि स्पाइसजेटमध्ये इंजिन दोनदा बंद पडले. एअर इंडिया आणि अलायन्स एअरमध्ये अशी घटना प्रत्येकी एकदा घडली. जेव्हा विमान उड्डाणादरम्यान गंभीर धोक्यात असते आणि त्वरित मदतीची आवश्यकता असते, तेव्हा पायलट तीन वेळा मेडे, मेडे, मेडे असे म्हणत हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधतो.




