पिंपरी | कामावरून काढून टाकल्याने खुनी हल्ला

पिंपरी, (प्रतिनिधी) – कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून सहकारी कामगाराला खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री आणि बुधवारी सकाळी खेड तालुक्यातील आंबेठाण येथे घडली.
धरमेंदर (वय 36, रा. उत्तर प्रदेश), श्याम बिहारी (वय 42, रा. उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कमलेश शर्मा असे जखमी कामगाराचे नाव आहे. कंत्राटदार रणजीत अमृत राठोड (वय 28, रा. वासुली, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कमलेश शर्मा आणि आरोपी धरमेंदर हे फिर्यादी यांच्याकडे सेंट्रींगचे काम करतात. मंगळवारी राठोड हे बांधकाम साइटवर गेले असता कमलेश याने त्यांना सांगितले की, धरमेंदर आणि त्याचा मित्र श्याम बिहारी हे दररोज दारू पित असतात.
त्यामुळे राठोड यांनी धरमेंदर याला कामावरून काढून टाकले. मंगळवारी रात्री धरमेंदर आणि श्याम बिहारी हे दोघे पुन्हा दारू पिऊन साइटवर आले आणि त्यांनी गोंधळ घातला.
याबाबत कमलेश यांनी राठोड यांना सांगितले. राठोड यांनी त्या दोघांना हाकलून देण्यास सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी धारदार हत्याराने कमलेश यांच्या डोळ्यावर, कपाळावर, डोक्यात वार करून गंभीर जखमी केले.





