नगर -पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडचा वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजता भिंगारमध्ये घडली. मंदा सुनील वैराळ (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार) असे मयत महिलेचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळतीच भिंगार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुनील हिरामण वैराळ याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर नवनाथ लोंढे (वय 57, रा. गणपती मंदिराजवळ, वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुनील व मंदा हे दोघे पती-पत्नी गंगाधर लोंढे यांच्या घराच्या वरील मजल्यावर त्यांच्या दोन मुली आणि एका मुलासह भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते.
सोमवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास सुनील वैराळ याने काही तरी कारणाने पत्नी मंदा हिच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी करून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. देशमुख, उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी यांनी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी वैराळ याला पोलिसांनी अटक केली आहे.