सातारा – तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाचा पोलीस ठाण्याच्या आवारातच कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता सातारा शहरात घडली. सुरेश कांबळे (वय 35, रा. सैदापूर ता. सातारा) याचा खून झाला असून रामा तुकाराम दुबळे (रा. सैदापूर) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सुरेश कांबळे आणि रामा दुबळे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. या वादातून रामा दुबळे याने सुरेश कांबळे यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी सातारा तालुका पोलिसांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावले होते.
सुरुवातीला रामा दुबळे हा पोलीस ठाण्यात आला होता. मात्र, सुरेश कांबळे पाठीमागून येणार होता. त्यामुळे तो त्याची वाट पाहत पोलीस ठाण्यासमोर उभा होता. दोघेही पोलीस ठाण्यात आल्यानंतर समोरासमोर घेऊन पोलीस दोघांमध्ये तोडगा काढणार होते. दरम्यान, रामा दुबळे सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर उभा होता. सुरेश कांबळे अचानक तेथे आला. त्याने कोयत्याने रामा दुबळेवर वार केला त्याचवेळी सुरेशच्या हातातून कोयता खाली पडला. हाच कोयता रामा दुबळेने हातात घेतला.
सुरेश कांबळे पोलीस ठाण्यात पळत सुटला. त्याच्या पाठोपाठ रामा गेला. त्याने पोलिस ठाण्याच्या आवारातच सुरेशच्या पोटावर वार केला. सुरेश जखमी अवस्थेत पोलीस ठाण्याच्या पायरीजवळ आला. तेथेही रामा दुबळेने सुरेश कांबळेच्या डोक्यावर वार केले. या झटापटीत दोन पोलिसही जखमी झाले. पोलीस ठाण्यात आणि पोलीस ठाण्यासमोर रक्ताचा सडा पडला होता.
या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सुरेश कांबळे यांचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्याच्या आवारातच खून झाल्याने जिल्हा पोलिस दल अक्षरशः हादरून गेले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. या खुनाची माहिती सैदापूरमध्ये पोचल्यानंतर मोठ्या संख्येने जमाव सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर आला होता. पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
ज्याचा कोयता त्याचा खून
वाद झाल्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी सुरेश कांबळे व रामा दुबळे आले होते. यावेळी सुरेश कांबळेने दुबळेवर वार करण्यासाठी सोबत कोयता आणला होता. मात्र, कांबळेने दुबळेवर वार केल्यानंतर खाली पडलेला कोयता दुबळेने घेतला अन् कांबळेचा खून झाल्याने ज्याचा कोयता त्याचाच खून झाल्याचे बोलले जात आहे.
तपास सीआयडीकडे जाणार का?
पोलीस ठाणे ही व्याख्या धरून पोलीस कोठडीतील मृत्यू फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 नुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडल्याने हा तपास सीआयडीकडे जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.