पिंपरी – पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. 7) रात्री प्रेमप्रकरणातून चार ते पाच जणांनी 20 वर्षीय युवकावर धारदार हत्याराने वार करीत त्याचा खून केला. विराज विलास जगताप (वय 20, रा. तक्षशिला नगर, पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील पुलावर चार ते पाच जणांनी विराज याच्यावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विराज याला खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना सोमवारी (दि. 8) दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विराजच्या नातेवाईकांनी काही संशयितांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. सांगवी पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या मागावर आहे. लवकरच आम्ही आरोपींना अटक करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचे सांगवी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.