सांगली(प्रतिनिधी) -दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून सर्फराज मोहम्मद शेख (वय 30, रा. बेळगाव) या तरुणाचा जमीर शब्बीर शेख (वय 31, रा.मंगळवार पेठ, मिरज) या अट्टल गुन्हेगाराने मिरजेत डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी जमीर शेखला अटक केली आहे. सर्फराज शेख हा तरुण मिरजेत गवंडी काम व फळे विकत होता. दारूच्या व्यसनातून त्याची जमीर शेखशी मैत्री झाली. जमीरने दि. 21 मे रोजी दुपारी सर्फराजकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. त्यास सर्फराजने नकार दिल्याने चिडून जाऊन जमीरने त्याच्या डोक्यात दगड घातला. यात गंभीर जखमी झालेल्या सर्फराजचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू शनिवारी (दि. 30 मे) मृत्यू झाला. याप्रकरणी जमीरला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.