लॉक डाऊननंतर बसले अन् एकाच्या जीवावर बेतले

पुणे(प्रतिनिधी) – लॉक डाऊननंतर बऱ्याच दिवसांनी मित्र दारु पिण्यासाठी एकत्र बसले. मात्र दारुपिण्यातून वाद झाल्याने एकाच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून करण्यात आला. ही घटना येरवडा येथील विकफिल्ड येथील झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तीन ते चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फयाज शेख (26, रा.विकफिल्ड सोसायटी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फयाज शेख हा ऍक्वागार्ड कंपनीत रिपेअरींगचे काम करतो. लॉक डाऊननंतर बऱ्याच दिवसांनी त्याला काम मिळाले होते. तसेच त्याच्या इतर मित्रांनाही मागील काही दिवसांत कामे मिळाली होती. यामुळे त्यांनी आज(रविवारी) सेलिब्रेशन करायचे ठरवले. हे सर्वजण त्यांच्या रहात्या परिसरातील मोकळ्या जागेत दारु पिण्यासाठी बसले होते. यावेळी त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाले. या वादाचे पर्यवसन भांडणात झाले. यातून त्याच्या मित्रांनी त्याच्या डोक्यात दगड आणि प्लॅस्टीकचा पाईच टाकून खून केला.
याची खबर येरवडा पोलिसांना मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. संशयीत तीन जणांनी नावे पोलिसांना निष्पन्न झाली आहे. आरोपींच्या मागावर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांनी भेट दिली.





