पुणे – पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 65व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती र्स्प्धेत अंतिम फेरीसह बक्षीस वितरण समारंभासाठी संयोजन मुरलीधर मोहोळ यांनी भाजप खासदार ब्रृजभूषण सिंग यांना आमंत्रित केले होते. त्यासाठी सिंह हे शनिवारी सकाळी पुण्यात आले. तर बृजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेनिमित्त महाराष्ट्रात येणार असल्याने राज ठाकरे आणि मनसैनिक कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष होते.
मात्र, बृजभूषण सिंह-राज ठाकरे वादावर महाराष्ट्र केसरीचे आयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले, “स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी हे सांगितलं आहे की, आम्ही कोणत्याच पद्धतीचा विरोध त्यांना करणार नाही, आणि मला पण असं वाटतंय की ही योग्य भूमिका आहे.
तसेच हे कोणताही राजकीय व्यासपीठ नसून खेळाचे मैदान आहे. आणि बृजभूषण सिंह हे एका खेळाचे अध्यक्ष असून, ते फक्त बक्षीस वितरण करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे मला असा वाटतंय खेळात कोण राजकारण आणत नाही”. अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत…
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला भेट देणार होते, परंतु भाजप खासदार ब्रिजभुषण यांनी आम्ही राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नाही असे म्हटले होते. तसेच ‘राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत’ असं म्हणत त्यांनी टीका केली होती.