वेगवेगळ्या माध्यमातून गिरवताहेत धडे : ऑनलाइन शिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी – महापालिका शाळांतील मुलेही आता “टेक्नोसेव्ही’ होऊ लागली आहेत. त्यांची आता मोबाइलशी गट्टी जमली असून त्यांना ऑनलाइन अभ्यास जमू लागला आहे. शाळेकडून आयोजित ऑनलाइन कृती कार्यक्रमात मुले उत्साहाने सहभागी होत आहेत. शिक्षक दिन कार्यक्रम, महात्मा गांधी जयंतीला आयोजित बालसभा आदी ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि विश्वविख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. कलाम यांचे स्वप्न होते की देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यांच्या या स्वप्नाला महापालिकेच्या शाळेत शिकणारी गरीब घरातील मुले साकारत आहेत.
महापालिका शाळांमध्ये सर्वसामान्य घरातील कष्टकऱ्यांची मुले शिक्षण घेतात. काही मुलांचे आई-वडील हे रोजंदारीवर मोलमजुरीची कामे करतात. तर, काही मुलांचे पालक हे कामगार वर्गातील आहेत. कष्टकरी, कामगारांची मुले म्हणून त्यांच्या वाट्याला असलेला रोजचाच संघर्ष चुकलेला नाही. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात मिसळू लागली आहेत.
दरवर्षी 15 जूनला महापालिका शाळा सुरू होतात. यंदा करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थितीने राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नाही. पर्यायाने, खासगी शाळांबरोबरच महापालिका शाळांनी देखील मुलांचे “ऑनलाइन’ शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला.
ऑनलाइन शिक्षण देताना ऑनलाइन क्लास घेण्याचा पर्याय पचनी पडणारा नव्हता. त्यामुळे शिक्षकांनी पालकांचे वर्गनिहाय व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केले. त्या ग्रुपवर जून महिन्यापासून दररोजचा अभ्यास टाकण्यास सुरवात केली. व्हिडिओ, ऑडिओ आणि संदेशाद्वारे मुलांना अभ्यास देण्यात आला.
त्याशिवाय, शासनाच्या दिक्षा ऍपवर देखील पहिली ते बारावीपर्यंतच्या ऑनलाइन शिक्षणाची सुविधा करण्यात आली आहे. महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळांतील तर, 18 माध्यमिक शाळांतील विद्यार्थी सध्या ऑनलाइन अभ्यासाचे धडे गिरवित आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास सुकर व्हावे, यासाठी शिक्षकांकरीता खास “अल्पभाषा’ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले.
‘ऑफलाइन’ अभ्यासही सुरू
महापालिका शाळेतील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल नाही त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन शिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांना कृतीपत्रिका देऊन त्या सोडवून घेतल्या जात आहे. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास शक्य नसणाऱ्यांना “ऑफलाइन’ अभ्यासाची जोड दिली जात आहे.
विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा
ऑनलाइन अभ्यासाला विद्यार्थ्यांचा मिळणारा उत्साह हा वाखाणण्यासारखा आहे. शाळा बंद असल्या तरीही 5 सप्टेंबरला शिक्षक दिन, 2 ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती हे कार्यक्रम “ऑनलाइन’ घेण्यात आले. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी घरबसल्या शिक्षकाची भूमिका पार पाडत त्याचे व्हिडिओ बनवून “शेअर’ केले होते. त्याशिवाय, “कौन बनेंगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली आयोजित केली होती. त्यालाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.