पुणे – करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 14 मार्चपासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. या कालावधीत विद्यार्थी घराबाहेर पडू नयेत तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळा आणि “आयटीआय’मध्ये “लर्न फ्रॉम होम’ची संकल्पना राबवली जात आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेमधील विद्यार्थ्यांचे इयत्तेनुसार व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केले आहेत. याद्वारे शिक्षक रोज विद्यार्थ्यांना काही ठराविक पाठ्यक्रमावर स्वाध्याय देतात. ते स्वाध्याय विद्यार्थी घरी वहीमध्ये सोडवतात आणि सोडवलेले स्वाध्याय पानाचे फोटो काढून ते ग्रुपवर पोस्ट करतात. त्याप्रमाणे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांनीदेखील कृती आराखड्यानुसार इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना घरी करण्यात येण्यासारखे अभ्यासक्रम देण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार “दिशा’ ऍप डाऊनलोड करून दैनंदिन ऑनलाइन अभ्यासक्रम इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिला जात आहे.
सर्व विषयांच्या पाठांचा समावेश असणारा हा ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थी केवळ लिंकवर क्लीक करून आपल्या मोबाइल स्क्रीनवर पाहून आत्मसात करून घेत आहेत.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे देखील ट्रेंडनुसार व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केले असून, त्यांचा नियोजित अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. राज्य सरकारच्या “लर्निंग ऍप’द्वारे युट्युबवर व्याख्याने घेतली जातात तसेच ऑनलाइन टेस्टद्वारे प्रश्नोत्तराचा सराव घेतला जात आहे.