पुणे – पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल आणि आणि पुणे-दौंड मार्गावरील डेमू रेल्वेत सर्वसामान्य प्रवाशांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच यातून प्रवास करता येणार आहे. तर, संबंधित पास देण्यासाठी पुणे मनपा आणि जिल्हाधिकारी प्रशासन सरसावले आहे. त्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण भागात रेल्वे प्रवास पास देण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे विभाग प्रमुखांसाठी समन्वय ठेवून प्रवास पास देण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा राज्यशासनाने दिली आहे. मात्र, त्यासाठी ओळखपत्र आवश्यक करण्यात आले. परंतु हे ओळखपत्र नेमके कोणाकडून घ्यायचे, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम होता. त्यावर मंगळवारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून पास देण्याबाबतचे नियोजन केले आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र व आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राच्या छायांकित प्रतीवर शिक्का देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रत्येकाला करोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. मदत केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता असून स्थानिक पोलिसांची प्रशासनाने मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत भागासाठी हा आदेश लागू करण्यात आलेला आहे. प्रवासादरम्यान प्रवाशास रेल्वे पास आणि दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र व फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे.
महापालिकाही उपलब्ध करणार कर्मचारी
पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील लोकल रेल्वे प्रवाशांसाठी सुरू करण्यास महापालिका आयुक्तांनीही मान्यता दिली आहे. पण, त्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने पास द्यावेत, अशी भूमिका रेल्वेने घेतली होती. त्यावर तोडगा काढत हे पास देण्यासाठी आणि पडताळणीसाठी महापालिकेनेही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
ज्या नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत, तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांची खातरजमा करण्याबाबत प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड आणि छायाचित्र ओळखपत्र यांची पडताळणी आवश्यक आहे. त्यासाठी दोन रेल्वे स्थानकांवर मनपाच्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी करायचे काम
प्रवाशाने दोन्ही डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र, शासनाने दिलेले फोटो ओळखपत्राची छायांकित प्रत तपासून त्यावर शिक्का उमटवणे, लस प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करून ते संबंधिताचेच असल्याबाबत खात्री करणे, त्यामध्ये कागदपत्रावरील नावे, लसीच्या तारखा, दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले आहेत याची पडताळणी करणे. त्यानंतर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर तसेच आय कार्डच्या छायांकित प्रतीवर महापालिकेमार्फत पुरवण्यात आलेला “युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास ऍप्रुव्हड’ चा शिक्का उमटवून चिन्हांकित करण्यात यावा. या आधारे रेल्वे तिकिट काऊंटरवर रेल्वे कर्मचाऱ्यामार्फत मासिक पास अथवा तिकिट दिले जाईल.