पुणे | रेबीजमुक्त पुण्यासाठी महापालिका सरसावली

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्र शासनच्या सूचनेनुसार रेबीजमुक्त पुण्यासाठी महापालिका सरसावली असून, शहरात आजपासून पुढील १५ दिवस सामूहिक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जागतिक रेबीज लसीकरण दिवस २८ स्पटेंबर रोजी साजरा केला जातो.
त्यानिमित्त २८ ते २९ सप्टेंबर या कालावधीत भटक्या, मोकाट आणि पाळीव कुत्र्यांसाठी पुणे मनपा श्वानपथक , युनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सेासायटी, कॅनाइन कंट्रोल केअर या संस्थांमार्फत मोफत ऍन्टी रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
हडपसर, कोरगाव पार्क, कोथरूड, वाघोली या भागांमध्येही दोन दिवसांची मोहीम राबवली जाणार आहे. शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच समाविष्ट गावांमध्येही भटकी कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने शहरात कुत्रे चावण्याच्या घटना वाढलेल्या आहेत.
उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, त्यांच्या चावण्यामुळे, तसेच गाड्यांमागे धावण्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग घडत आहेत. या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.
दरवर्षी ६५ हजार लसीकरण
महापालिकेकडून शहरात दरवर्षी सुमारे सरासरी ५० ते ६० हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाते. हे लसीकरण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केले जाते. त्यामुळे या कुत्र्यांनी कोणालाही चावा घेतल्यास नागरिकांना रेबीजची लागण होण्याची शक्यता कमी होते.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महापालिकेने २०२४ च्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १८ हजार ८२४ भटकी आणि मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर ३ हजार १४५ भटक्या कुत्र्यांना रेबीजची लस देण्यात आली आहे.
२०२३ -२४ या आथिक वर्षात ६४ हजार ७३० भटक्या कुत्र्यांना रेबीजचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.




