पुणे – तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने महापालिकेने शहरातील 11 फ्लू क्लिनिक बंद केली आहेत. येथील कर्मचाऱ्यांना सिंहगड महाविद्यालय आणि बालेवाडी येथील निकमार येथील विलगीकरण केंद्रातील काम दिल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच ज्या भागातील ही क्लिनिक बंद झाली आहेत, त्यांनी पालिकेच्या जवळच्या रुग्णालयात तपासणीसाठी जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
शहरातील करोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी पालिकेने 50 हून अधिक फ्लू सेंटर सुरू केली होती. या सर्व ठिकाणी संशयित रुग्णांना तपासून नंतर पुढील तपासणीसाठी कोविड रुग्णालयात पाठवले जाते. तेथे या रुग्णांचे स्वॅब घेतले जातात. मात्र, शहरात अचानक रुग्णसंख्या लक्षणीय वाढू लागली आहे. त्यातही बहुतांश रुग्ण हे वस्ती पातळीवरील आहेत. त्यामुळे ज्या भागात रुग्ण सापडत आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना पालिकेकडून संस्थात्मक विलगीकरण केले जात आहेत.
आतापर्यंत शहरात सुमारे 700 हून अधिक जणांना वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण केले आहे. मात्र, ज्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येते, तेथे त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टर, नर्सेस तसेच इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.