Pimpri : महापालिका उभारणार संविधान भवन

पिंपरी : महापालिकेच्या वतीने संविधान भवन आणि विपश्यना केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या इमारतीवर तब्बल ११६ कोटी ८९ लाख ९९ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. संविधान भवनाच्या बांधकामासाठी युनिवास्तू इंडिया लि. कंपनीला काम देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
देशाच्या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृतीसाठी शहरात संविधान भवन उभारणार आहे. चिखली प्राधिकरण पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीतील पेठ क्रमांक ११ मधील २५,८९४.२ चौरस मीटर क्षेत्रफळाचा मोकळा भूखंड क्रमांक २, संविधान भवन आणि विपश्यना केंद्राच्या बांधकामासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याची ई-निविदा २ कोटी ५३ लाख २५ हजार ४०७ आणि दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ११७ कोटी अशी एकूण ११९ कोटी ७१ लाख ३५ हजार ३२६ रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
यामध्ये युनिवास्तू इंडिया लि. यांनी निविदेच्या ३.१६ दर आणि विक्रम इन्फोटेक डेव्हलपर्स प्रा.लि. यांनी ४.५१ दर दिला होता. त्यामुळे युनिवास्तू इंडिया लि. या ठेकेदाराची निविदा ११७ कोटी १८ लाख ९ हजार मधून रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेस वगळून ११६ कोटी ८९ लाख ९९ हजार ५४४ पेक्षा १.८५ जास्त दराने निविदा प्राप्त झाली.
त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार ठेकेदाराने ११९ कोटी ६ लाख २६ हजार रुपये आणि रॉयल्टी चार्जेस व मटेरियल टेस्टींग चार्जेस असे एकूण ११९ कोटी ४० लाख २२ हजार पर्यंत काम करुन घेण्यास मान्यता दिली आहे. या कामाची मुदत ३० महिन्यांची राहणार आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय बांधण्यात येणार आहे. लोकशाहीमधील घटनांचा अभ्यास करता यावा, असा संकल्प घेवून संविधान जागृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय याठिकाणी उभारण्यात येणार आहे.





