पिंपरी – शहरामध्ये 21 फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला यश आले आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने महापालिकेने मोकळ्या मैदानांमध्ये हे केंद्र सुरू केले आहेत. महापालिकेच्या शहरातील 7 भाजी मंडई मात्र बंद ठेवण्यात आल्या आहेत.
नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक स्तरावर 46 ठिकाणी फळे व भाजीपाला विक्री केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला. त्यातील आत्तापर्यंत प्रत्यक्ष 21 केंद्र सुरू झाले आहेत. शहराच्या सीमा सील केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या संबंधित केंद्रांची वेळ 27 तारखेपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 अशी राहणार आहे. महापालिकेच्या पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, वाकड, भोसरी आणि थेरगाव येथील बंदिस्त भाजी मंडई पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
महापालिकेची सुरू झालेली फळे व भाजीपाला विक्री केंद्र : 1) सम्राट चौक, मोरवाडी-पिंपरी 2) नियोजित महापौर निवासस्थान मोकळे मैदान, सिटीप्राईड शाळेशेजारी, प्राधिकरण. 3) बहिरवाडे क्रीडांगण, शाहूनगर. 4) काका हलवाई स्वीटशेजारी, शाहूनगर. 5) आंबेडकर चौक, डी मार्ट शेजारील भूखंड, रावेत. 6) तालेरा ग्राऊंड, केशवनगर-काळेवाडी रस्त्यावर, केशवनगर. 7) वाल्हेकरवाडी पोलीस चौकीजवळ, वाल्हेकरवाडी. 8) भोसरी गावजत्रा मैदान, भोसरी. 9) रिव्हर रेसीडेन्सी, मोशी 10) इंद्रायणीनगर, पेठ क्रमांक 7, भोसरी. 11) पेठ क्रमांक 6, जलवायुविहार, मोशी. 12) मासुळकर कॉलनी भाजी मंडई, मासुळकर कॉलनी.
13) मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर. 14) एस.पी.जी. शाळा, आळंदी रस्ता, भोसरी. 15) सीडीसी ग्राऊंड, शनि मंदिर, पूर्णानगर, चिखली. 16) अण्णाभाऊ साठे अभ्यासिका केंद्र, यमुनानगर. 17) नवमहाराष्ट्र शाळा मैदान, पिंपरी. 18) कैलास मंगल कार्यालय, थेरगाव. 19) सर्व्हे क्रमांक 628, वनदेवनगर, थेरगाव. 20) शितळादेवी मंदिराजवळ, सितांगण गार्डन, कासारवाडी. 21) पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी.
महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी आत्तापर्यंत मोकळ्या मैदानांवर 21 फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. आणखी केंद्र सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे.
– अजित पवार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.