दिव्यांगांसाठी पुणे महापालिकाच दिव्यांग

रॅम्प सदोष, बांधकामही चुकीच्या जागी, लाखो रुपये पाण्यात

पुणे – ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांच्या रॅम्पचा विषय चर्चिला गेल्यानंतर पुणे महापालिकेत दिव्यांगांसाठी रॅम्प बांधण्यात आला. मात्र, त्याचा दिव्यांगांना लाभ होण्याऐवजी त्रासच अधिक होत असल्याचे दै. प्रभातने केलेल्या पाहणीतून दिसून आले. त्यामुळे या कामावर खर्च करण्यात आलेले 10 ते 12 लाख रुपयांतून ठेकेदाराने स्वतःचे हित साधले काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 5 टक्के दिव्यांगांचा निधी खर्च करण्यासाठी एक समिती बनवून त्यात दिव्यांग सदस्य घ्यायला पाहिजे, असा कायदा आहे. परंतु, हा कायदा केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येते.

“सत्यमेव जयते’ मध्ये दिव्यांगांकरिता रॅम्प अनिवार्य करा, अशी चर्चा झाल्यानंतर महापालिकेने तो बांधला. सुरूवातीला लाकडी असणारा हा तात्पुरत्या स्वरूपाचा रॅम्प सुमारे सव्वा वर्षापूर्वी पडला, त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये नव्याने सिमेंट कॉंक्रिटचा रॅम्प उभारला गेला. परंतु, हा रॅम्प सदोष असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, दिव्यांगांची दमछाक होताना दिसते. दिव्यांगांना विचारात न घेता तो बांधण्यात आला असून दररोज यातून सोय होण्याऐवजी दिव्यांगांची गैरसोयच झाली आहे.

दरम्यान, तत्त्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकाळात रॅम्पचा विषय सर्वप्रथम चर्चेत आला होता. परंतु, आजही हा प्रश्‍न निकाली निघालेला नाही, अशी खंत दिव्यांगांकडून व्यक्त होत आहे. रॅम्प मुख्य प्रवेशद्वाराजवळ नसून कर आकारणी कार्यालयाजवळ आहे.

परिणामी, रॅम्पवर चढून जाऊन आतून पुन्हा लिफ्टपाशी यावे लागते. यातच आमची दमछाक होते. आमचे 90 टक्के काम पालिका आयुक्तांकडे असल्याने त्यांनाच भेटायला आम्ही येतो. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात जाण्याच्या दिशेला हा रॅम्प असावा, अशी मागणी आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलन सदस्यांनीही याबाबत पाठपुरावा केला आहे. दरम्यान, उच्च शिक्षित नागरी अभियंते (सिव्हिल इंजिनिअर्स) यांनी सुगम्य भारत योजना अंतर्गत रॅम्प बांधला. याकरिता पालिकेने नियोजन समितीचीही स्थापना केली. मात्र, हा रॅम्प दिव्यांगाना विचारात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता बांधला गेला असून दिव्यांगांना कुणीही वाली नाही, असा सूर दिव्यांगांकडून निघत आहे.

व्हिलचेअरची जागाही चुकीची…
व्हिलचेअर महापालिकेत ज्या ठिकाणी ठेवली गेली आहे ती जागा चुकीची असल्याचे दिसून आले. चेअरच्यावर छत नसल्याने उन्हाळ्यात ती तापते व पावसाळ्यात ती ओली होते. परिणामी, दिव्यांगांना अशा व्हिलचेअरवरून उन्हाळ्यात चटके खात किंवा पावसाळ्यात ओले चिंब होत जावे लागते.

या गोष्टींची मागणी…
– रॅम्पवर छत हवे
– चांगल्या स्थितीतील किमान 4 व्हिलचेअर हव्यात
– मोटार असणारी एकतरी व्हिलचेअर हवी
– दिव्यांगांशिवाय अन्य कुणालाही रॅम्पवर प्रवेश नसावा
– रॅम्पवर आडव्या पट्ट्या हव्यात

सदोष रॅम्पबाबतच्या प्रकाराबाबत माझ्या कानावर अजून काहीही आलेले नाही. याबाबत कुणी तक्रार केली असल्यास आवक-जावक विभागात ती केली जाते. तक्रार माझ्यापर्यंत आल्यावर याबाबत अधिक बोलू शकेन.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका


रॅम्पवरील टाइल्स गुळगुळीत असून पावसाळ्यात त्यावरून पडण्याचा धोका असतो. रॅम्पवर तीन ठिकाणी गटाराच्या चेंबरची झाकणे असून दिव्यांगांना व्हीलचेअरवरून जाण्यास अडथळा निर्माण होतो. सदोष रॅम्पमुळे आमची पुरती दमछाक होते. व्हिलचेअरची अवस्थाही वाईट असून फूट रेस्ट किंवा चाक कधीही निखळू शकते. मदतनिसाच्या मदतीशिवाय आम्ही जाऊच शकत नाही.
– रफिक खान, सदस्य, प्रहार अपंग क्रांती आंदोलन 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.