प्रभात वृत्तसेवा पुणे – कोरेगाव पार्कजवळच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीचा जबाब नोंदविण्यात आला. याप्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून, यापूर्वी तिघांचे जबाब नोंदविले आहेत.या प्रकरणी हेमंत गवंडे, शीतल तेजवानी, दिग्वीजय पाटील, तहसीलदार सुर्यकांत येवले यांना पुणे पोलिसांनी जबाब नोंदविण्याबाबत नोटीस बजावली आहे. हेमंत गवंडे यांनी सोमवारी (दि.१७) जबाब नोंदविला. त्यानंतर मंगळवारी (दि.१८) शीतल तेजवानी या जबाब नोंदविण्यास हजर राहिल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तेजवानी यांनी जबाब नोंदविला असून, त्याचे अवलोकन सुरू आहे. याप्रकरणात विविध शासकीय विभागांकडून कागदपत्रे मागविली आहेत. या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासात गरज भासल्यास शीतल तेजवानी यांना चौकशीला पुन्हा बोलविण्यात येईल, दिग्विजय पाटील यांना नोटीस दिली असून, ते अद्याप जबाबासाठी हजर झालेले नाहीत, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, बोपोडीतील जमीन प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचा संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणीचा गुन्हा खडक पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. मुंढवा जमिनीवर २७५ जणांची नावे मुंढवा येथील ४० एकर जमिनीवर २७५ जणांची नावे आहेत. ही जमीन कुलमुख्यारपत्र करुन शीतल तेजवानी यांना संबंधित व्यक्तींनी दिली आहे. त्याअनुषंगाने तपास सुरू आहे. या प्रकरणातील २७५ जणांना काही मोबदला दिला आहे का ? जमिनीबाबत त्यांना हक्क कसा देण्यात आला, यादृष्टीने तपास सुरू आहे. त्यानुसार संबंधितांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी दहा ते बाराजण आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहिले. काहींनी आम्ही नंतर जबाब नोंदवू, अशी भूमिका घेतली.