संसदीय अधिवेशन : NITIE आता IIM मुंबई! संसदेत बिल पास; ठरली देशातील 21 वी व्यवस्थापन संस्था

नवी दिल्ली/ मुंबई :- संसदेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अमेंडमेंट बिल 2023 पास झाले असून त्यामुळे आता मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (एनआयटीआयई) या संस्थेचे अधिकृत नाव “आयआयएम मुंबई’ असे होणार आहे. मुंबईतील आयआयएम ही देशातील 21 वी आयआयएम संस्था असेल.
त्यामुळे या संस्थेत सध्या शिकत असलेल्या जवळपास 1200 मुलांना या वर्षीपासून आयआयएम मुंबईचे सर्टिफिकेट मिळणार आहे, अशी माहिती एनआयटीआयईच्या प्रमुखांनी दिली आहे.
एनआयटीआयईमध्ये सध्या वेगवेगळ्या कोर्ससाठी 1200 मुले शिक्षण घेत असून त्या सर्वांना या वर्षीपासून “आयआयएम मुंबई’चे सर्टिफिकेट मिळणार आहे. येत्या वर्षापासून आयआयएम मुंबईची प्रवेश क्षमता दुप्पट करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. तसेच या संस्थेसाठी लागणारा अधिकचा स्टाफही भरून घेण्यात येणार आहे.
मुंबईच्या पवईतील “नीटी’ अशा नावाने प्रचलित असणाऱ्या संस्थेलाच या बदलामुळे आता नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे इथे आता एमबीएच्या जवळपास साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आता देशातील 21 आणि महाराष्ट्रातील दुसरी आयआयएम शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या आयआयएमकडे पाहिले जाणार आहे.
आर्थिक राजधानीची मागणी पूर्ण…
आयआयएममध्ये शिकण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी मग मुंबईतील विद्यार्थी राज्याबाहेरील आयआयएमच्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता मुंबईतील विद्यार्थ्यांना मुंबईत आयआयएम मधून शिकण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबई नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत होती. तसेच वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येते. यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या होत्या.
1963 मध्येच झाली होती स्थापना…
मागील वर्षी फेब्रुवारी मध्येच पवईतील “नीटी’ शिक्षण संस्थेला मुंबईचे आयआयएममध्ये रुपांतर करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहालाबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. “नीटी’ ही भारत सरकारने 1963 मध्ये स्थापन केलेली एक स्वायत्त संस्था आहे. औद्योगिक अभियांत्रिकी, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन विज्ञान क्षेत्रातील तरुणांना शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य “नीटी’ ही संस्था करत आहे.





