मुंबई – जानेवारी ते मार्च दरम्यानच्या चौथ्या तिमाहीत मुंबई शेअर बाजाराचा नफा दुपटीने वाढून 71 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत मुंबई शेअर बाजाराला केवळ 31 कोटी रुपयाच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते.
या तिमाहीत मुंबई शेअर बाजाराचा महसूल 204 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत मुंबई शेअर बाजाराचा महसूल 152 कोटी रुपये इतका होता. ताळेबंद जाहीर करताना मुंबई शेअर बाजाराने प्रती शेअरला 13 रुपये 50 पैशाचा लाभांश जाहीर केला आहे.
बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौव्हाण यांनी सांगितले की, बाजाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे देश-विदेशातील नागरिकांना शेअर बाजारात सहज गुंतवणूक करता येत आहे. आगामी काळात ही विस्तारीकरणाचा कार्यक्रम चालू ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.