मुंबई – मुंबईच्या साकीनाका परिसरात काल एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले होते. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री (9 ऑगस्ट) घडला. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
या महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. पीडित महिलेचे आतडे बाहेर आले असल्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.