Mumbai Rain – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पण आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पण दुपारनंतर मुंबई उपनगरांमधील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर ठाण्यातही सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत असून सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर, तसेच माहिम, माटुंगा, दादर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आज अचानक आलेल्या पावसाने पुन्हा एकदा नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सकाळपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील काही भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातही सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून आता या जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तास ठाण्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे आता हवामान खात्याने ठाण्यात यलो अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या तरी मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सुरळीत सुरू आहेत. तर रस्ते वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे.