कंगनाविरोधात मुंबई पोलिसांचा चौकशी अहवाल सादर; 5 एप्रिलला पुढील सुनावणी

मुंबई,  – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतविरोधात मुंबई पोलिसांनी आपला प्राथमिक चौकशी अहवाल गुरुवारी (4 मार्च) मुंबईच्या वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात सादर केला. कंगना आणि तिच्या बहिणीने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात केलेल्या चौकशीचा हा प्राथमिक अहवाल आहे. गेल्या सुनावणीत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले होते. यावर प्राथमिक युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने यावरील सुनावणी महिन्याभरासाठी तहकूब केली. आता 5 एप्रिल रोजी यावर दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद होईल.

कंगना आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्याविरोधात वकील अली काशिफ खान देशमुख यांनी राष्ट्रद्रोह आणि सामाजिक अशांतता निर्माण केल्याची फौजदारी फिर्याद वांद्रे न्यायालयात दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राबाबत कंगना रनौतने काही वादग्रस्त ट्‌वीट केल्याचा आरोप देशमुख यांनी कंगनावर केला आहे. तसेच या दोघींनी लॉकडाऊनदरम्यान एका विशिष्ट समाज घटकाला करोना पसरवणारे दहशतवादी संबोधले, असा आरोप या तक्रारीमध्ये केलेला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेला हा पहिलाच अहवाल आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीला नोटीस बजावत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.