मुंबई – मुंबईमध्ये होणा-या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मुंबई पोलिसांकडून सुरक्षा पुरविली जात असते. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ठराविक शुल्क आकारले जाते. मात्र, विविध सामन्यांसाठी आकारलेले तब्बल 14.82 कोटी रुपयांचे शुल्क एमसीएने थकविल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे.
तसेच मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला 35 स्मरणपत्रेही पाठविलेली आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला विविध क्रिकेट सामन्यांसाठी दिलेली सुरक्षा आणि त्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा शुल्काविषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून माहिती मागितली होती.
मुंबई पोलिसांनी अनिल गलगली यांना गेल्या 8 वर्षातील विविध क्रिकेट सामन्यांबद्दल माहिती दिली.या सामन्यांमध्ये वर्ष 2013 मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष 2016 चा विश्वचषक टी -20, वर्ष 2016 मधील कसोटी सामने, 2017 आणि वर्ष 2018 मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे 14 कोटी 82 लाख 74 हजार 177 रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या 8 वर्षात केवळ 2018च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले 1.40 कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना 35 स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर 9.5 टक्के व्याज आकारले जाणार आहे.