Mumbai Police : सरकारचा मोठा निर्णय ! मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानातील ९ ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या जबरदस्त प्रहाराने मात्र पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. २२ एप्रिलपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या मिसाईल्स भारतीय लष्कराने हाणून पाडल्या. त्यानंतर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. त्यानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत अनेकदा बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्लेही घडविण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. मुंबई पोलीसही सर्वत्र तैनात असून सुरक्षा यंत्रणा नेहमीच अलर्ट असते. मुंबईत प्रसिद्ध ठिकाणे किंवा गर्दीची ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली जाते, त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, गर्दीच्या ठिकाणाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आला आहे.





