– राजेश पुरंदरे भाजप आणि शिंदेसेनेचा कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रभाव असला तरी मविआ मुसंडी मारू शकते. बदलापूर अत्याचार तसेच राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणारा जयदीप आपटे हे निवडणुकीतील विशेष मुद्दे मविआच्या हाती आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाने आजवर अनेक मोठमोठाले नेते दिले; परंतु या भागाचा विकास विकासकाने केला असला तरीही इथली नेतेमंडळी पाण्याचे दुर्भिक्ष अद्यापही पूर्णपणे दूर करू शकली नाही. वाहतूककोंडीची समस्या ही येथे कोणत्याही क्षणी उग्र रूप धारण करेल अशी बनली आहे. ठाणे शहराला लागून असलेला मतदारसंघ मुंब्रा-कळवा. बिल्डरांचा विळखा पडलेल्या या ठाण्याच्या उपनगरात पाण्यापासून वाण्यापर्यंतच्या रोजच्या समस्या आहेत. इथे कुणाचाही पायपोस कुणाच्यातही नाही. जो तो पेंईंग गेस्ट असल्यासारखा इथे येतो व जातो. त्यामुळे येथील विकासाला तेवढ्याच प्रमाणात खीळ बसली आहे असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही. परिणामी लोकप्रतिनिधींना फारसा त्रासदायक ठरणारा हा मतदारसंघ आहे असेही म्हणता येऊ शकेल. नाही म्हणायला मुंब्य्राचा भाग जोडला गेल्यामुळे पोलिसांना 24 तास सतर्क ठेवणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे प्रस्थ बनले आहे. आव्हाडांनीसुद्धा इथे भाजप व अखंड शिवसेनेशी टक्कर देताना सामाजिक कार्य भरपूर केले. या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांचे पट्टशिष्य नजीब मुल्ला यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देत आव्हान दिले आहे. डोंबिवली मतदार विधानसभा संघ हा भाजपचा. इथे साजरी होणारी श्रावणातली मंगळागौर असो वा गुढीपाडवा ते पाहायला परदेशी पर्यटक येतात. गढूळ पाणी हा इथल्या रहिवाशांना आजारपण देणारा पाहुणा. गृहसंकुलांपेक्षा नियम कायदे दुर्लक्षून येथे उभारलेली बांधकामे, चिंचोळे रस्ते, फेरीवाल्यांनी अडवलेले रस्ते, दुकानदारांनी अतिक्रमण केलेले रस्ते हे महानगरपालिकेचे वैशिष्ट्य. इथला विकास होणे हे पुढील वीस वर्षे तरी अपेक्षित नसल्याचे महानगरपालिकेच्या अधिकार्यांना वाटते. अथक प्रयत्नांनी रवींद्र चव्हाणांसारख्या लोकप्रतिनिधींनी साथ दिल्यामुळे डोंबिवली पूर्व पश्चिम भाग जोडणारा ब्रीज बारा वर्षांनी बनू शकला. परंतु आजवर सर्व घरात मनपाची जलवाहिनी काही पोचू शकली नाही. महानगरपालिकेतील हा विषय मंत्रालयात नेऊन सोडवायला लागतो. याहून डोंबिवलीकरांचे दुसरे दुर्दैव नाही. रवींद्र चव्हाण राजकीयदृष्ट्या सक्षम असूनही उबाठा शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांनी आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आयात केलेला म्हात्रे हा शिवसेनेत मानाचे स्थान मिळवू शकला नाही. शिंदेंनी बंड केले नसते तर अद्यापही त्यांना शाखा स्तरावरच वावरावे लागले असते. परंतु विधानसभा निवडणुकीत उभे राहिल्याने त्यांचा चेहरा चार लोकांच्या ओळखीचा झाला इतकाच त्यांचा फायदा. ही लढत दुरंगी आहे असं वाटत असले तरी चव्हाण यांनी आधीच बाजी मारली असेही येथे बोलले जाते. कल्याण पूर्व लोकसभा मतदारसंघ रस्त्यांची वानवा असलेला. कोणताही शहरी भागाचा चेहरामोहरा नसलेला हा मतदारसंघ अद्यापही पूर्ण विकसित झालेला नाही. विविध आजाराचे रोग घेऊन चाललेला व अजूनही कोकणवासीयांचे प्राबल्य दाखविणारा म्हणून ओळखला जातो. शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय यांत प्राथमिक सुविधांचा कायम अभावच. अशा या मतदारसंघात सुषमा गायकवाड यांना उबाठाचे धनंजय बोंडारें यांनी आव्हान दिले आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात अखंड शिवसेनेचे कार्य भरपूर. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे दोन गट निर्माण झाल्यामुळे ही दुरंगी लढत चुरशीची होणार असल्याची लक्षणे आहेत. शिंदे सेनेच्या राजेश मोरेंना उद्धव ठाकरेंच्या सुभाष भोईर यांनी आव्हान दिले आहे. अर्थात भोईरांना हरवणे हे मोरेंना तितकेसे सोपे नाही. निकराने सामना करावा लागणार असल्याचे ते ओळखून आहेत म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते रोज संपर्कात आहेत. मनसेचे राजू पाटील यांनीही तेथून उमेदवारी अर्ज दाखल करून राज ठाकरेंची सभा आपल्या मतदारसंघात घेतली. त्यामुळे या मतदारसंघातून मनसेच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अनधिकृत दाटीवाटी झालेले शहर उल्हासनगर. माजी आमदार पप्पू कलानींचे वास्तव्य म्हणूनही उल्हासनगरची ओळख आहे. अशा या विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे पण ती शांतपणे होते की हिंसक घटनांना स्थान देते हे यावेळी पाहण्यासारखे आहे. भाजपाचे कुमार आयलानी येथून निवडणूक लढवत आहेत. आयलानींचे कार्य मोठे आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना साथही मिळेल. परंतु मोठ्या प्रमाणावर येथे राहणार्या सिंधी समाजाचा कल हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बोमी कलानी यांच्या बाजूने आहे. या बोमींना शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडून आयात केले आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील उठावाच्या वेळेपासून बोमींनी त्यांना साथ दिली होती. वंचित व मनसेने इथे उमेदवार दिला आहे. पण त्यांच्याकडून मतांची फोडाफोडी होण्याव्यतिरिक्त बाकी काही चमत्कार घडू शकेल अशी शक्यता नाही. अंबरनाथ मतदारसंघ हा नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिला आहे. अखंड शिवसेनेचा हा बालेकिल्लाच म्हणायला हवा. दुरंगी व तिरंगी लढत इथे अपेक्षित नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास समजले जाणारे बालाजी किणीकर यांनी येथून शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी देताना जशी प्रतिष्ठा पणाला लावली तशीच निवडणुकीतही त्यांना निवडून आणण्यासाठी लावण्याची शक्यता येथे नाकारली जात नाही. किणीकर हे शिंदे याच्या बंडापासून त्यांच्यासोबत होते. त्यामुळे अंबरनाथची उमेदवारी ही त्यांना आमदारकी मिळणार म्हणूनच दिली गेल्याचे बोलले जाते. किणीकरांना उबाठा शिवसेनेच्या राजेश वानखेडे यांनी आव्हान दिले आहे.