Mumbai News : अनंत चतुदर्शीच्या दिवशी मुंबईतील ‘हे’ 12 पूल राहणार बंद

मुंबई: अनंत चतुर्दशी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. गणेश मंडळे आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) व्यापक तयारी केली आहे. विशेष म्हणजे, विसर्जनाच्या दिवशी शहरातील 12 पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. कोणते आहेत हे पूल आणि पालिकेची तयारी, जाणून घेऊया.
विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेची खास तयारी
मुंबई महानगरपालिकेने अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी व्यापक व्यवस्था केली आहे. बीएमसीचे उपायुक्त प्रशांत सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जनस्थळी जर्मन तराफे, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका, क्रेन, नियंत्रण कक्ष, तात्पुरती शौचालये, फ्लड लाइट्स आणि सर्च लाइट्स यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था
245 नियंत्रण कक्ष आणि 129 निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. याशिवाय, 42 क्रेन आणि 287 स्वागत कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे.
वैद्यकीय सुविधा
115 रुग्णवाहिका आणि 236 प्रथमोपचार केंद्रे विसर्जनस्थळी उपलब्ध असतील. प्रत्येक नैसर्गिक विसर्जनस्थळी वैद्यकीय कर्मचारी तैनात असतील.
कृत्रिम तलाव आणि प्रकाश व्यवस्था
298 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकाशासाठी 6,188 दिवे आणि शोधकार्यासाठी 138 सर्च लाइट्स लावण्यात आले आहेत.
कर्मचारी तैनात
विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 10,000 हून अधिक पालिका कर्मचारी कार्यरत असतील.
विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष खबरदारी
विसर्जन मिरवणुकीदरम्यान 12 पुलांवर विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. या पुलांवर 16 टनांपेक्षा जास्त वजन टाकू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी पोलिस आणि पालिका कर्मचारी तैनात असतील.
विसर्जनाच्या दिवशी बंद राहणारे 12 पूल
1. घाटकोपर रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
2. करी रोड रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
3. साने गुरुजी मार्ग, ऑर्थर रोड येथील चिंचपोकळी रेल्वे पूल
4. भायखळा रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
5. मरीन लाइन्स रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
6. दादर टिळक रेल्वे पूल (रेल ओव्हर ब्रिज)
7. सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल (ग्रँट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
8. फ्रेंच रेल्वे पूल (ग्रँट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
9. केनेडी रेल्वे पूल (ग्रँट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
10. फॉकलॅण्ड रेल्वे पूल (ग्रँट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
11. महालक्ष्मी स्टेशन रेल्वे पूल
12. प्रभादेवी – कॅरोल रेल्वे पूल
मुंबई महानगरपालिकेच्या या नियोजनामुळे गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांनीही पालिकेच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





