– राजेश पुरंदरे ठाण्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. महायुती असल्याने मंत्री रवींद्र चव्हाण सोबत आहेतच परंतु माजी मंत्री जितेंद्र आव्हाड राजन विचारेंच्या सोबत असल्याने झुंज रोमांचक होण्याची चिन्हे आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे, ओवळा माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ऐरोली, बेलापूर, मीरा भाईंदर असे सहा मतदार संघ असून सध्या इथल्या सगळ्या लढती या पक्षफुटीमुळे मातब्बर नेतेमंडळींच्यात होणार आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचारावर भर देत घरोघरी संपर्क वाढवलाय. त्यामुळे उमेदवारांची सरबराई ठेवताना कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडू नये यासाठी बंदोबस्त राखताना पोलिसांची तारांबळ उडत आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते समोरासमोर येऊन बाका प्रसंग घडू नये यासाठी पोलिसांना शेवटपर्यंत पक्ष व कार्यकर्त्यांशी समन्वय साधावा लागत आहे. या विधानसभा मतदारसंघात गृह संकुलांबरोबरच औद्योगिक नगरींचीही काळजी घ्यावी लागत आहे. झोपड्यांचा ताण इकडेही आहे. परंतु त्यापेक्षा बिकट अवस्था गृह संकुलांची आहे. सहकार खात्याशी संबंधित होणार्या तक्रारी सामंजस्याने सोडवण्यासाठी आमदार महोदयांना कसोशीने वारंवार प्रयत्न करावे लागत आहेत. जुन्या इमारतींची डागडुजी हा प्रश्न येथे सोडवावा लागतोय. पुनर्विकास तर वेगाने होत आहे. त्या संबंधातील समस्या निपटण्यासाठी लोकप्रतिनिधींचा बराचसा वेळ वाया जात आहे. रस्त्यांवरील खड्डे यामुळे काही वेळा लोकप्रतिनिधींना तोंड लपवण्याची पाळी ओढवते. तसेच अवाढव्य वाढणार्या गृह संकुलांमुळे वाहतूक समस्याही इथे उग्ररूप धारण करीत आहे. ती सोडवण्यासाठी काही वेळा तर मंत्रालयापर्यंत धाव घ्यावी लागत आहे. पालघर जिल्ह्यात जाणारे मीरा-भाईंदर ठाण्यातच ठेवण्यात आल्यामुळे इथल्या वाहतूक समस्या ही केव्हाही अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. काँग्रेसने इथे डॉ. मुजफ्फर हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. सामाजिक कार्य समाधानकारक असलेल्या हुसेन यांना यंदा माविआमधील उबाठा शिवसेनेची साथ लाभणार आहे. त्यामुळे त्यांच्या मताधिक्यात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु भाजपने नरेंद्र मेहतांना येथून उभे केले आहे. मेहेतांचे कार्य अफाट आहे. थेट विले पार्ल्यापर्यंत मेहतांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे मेहतांचा विजय नक्की असल्याचे मानले जात आहे. मनसेचे संदीप राणे उभे आहेत परंतु ते उबाठा सेनेची शंभर-दोनशे मतच स्वतःकडे वळवू शकतील. बाकी त्यांचे ना कार्य ना प्रभाव दिसत आहे. आवळा माजीवडा हा मतदारसंघ प्रताप सरनाईक यांचे राजकीय महत्त्व वाढवणारा ठरला असला तरी बिल्डर लॉबीने गिळंकृत केलेला अशी ओळख आहे. सरनाईकांचे कार्य फार नाही परंतु त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोस्तीची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे. त्यामुळे ते विजयी होतील असे शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. तथापि, नरेश मणेरा या उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराने सरनाईकांना कडवे आव्हान उभे केले आहे. मणेरांना आदिवासींसोबतच अमराठींची साथ येथे लाभत आहे. त्यामुळे सरनाईकांच्या मनात धडकी भरेल अशी पाळी त्यांच्यावर मतदानाच्या दिवसांपर्यंत येईल. मनसेच्या संदीप पाचगेने येथे तिरंगी लढत होण्यासाठी प्रचार करून रंग भरलाय परंतु खरी लढत सरनाईक व मणेरांच्यातच होण्याची चिन्हे आहेत. कोपरी-पाचपाखाडी हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. विजयश्रीची माळ उमेदवारी जाहीर करणे अगोदरपासूनच त्यांच्या गळ्यात पडली आहे असे मानले जाते. उबाठापेक्षा मातोश्रीला आव्हान देत त्यांनी जगभरात ठाण्याचे नाव सर्वतोमुखी केले अशी त्यांची ख्याती आहे. इथेही पुनर्विकासाबरोबरच वाहतूककोंडी, पाणी व परप्रांतीयांचे लोंढे हे प्रमुख मुद्दे आहेत. हे प्रश्न बिकट समस्या धारण करणारे असल्यामुळे त्यावरचे उपाय योजण्यास शासकीय यंत्रणेला वेळ लागेल. त्याचाच फायदा घेत उबाठा शिवसेनेच्या केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचे कार्य धाडसाने केले. केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या केदार दिघे यांनी सातत्याने शिंदेंवर बोट ठेवत त्यांना सतत हैराण करण्याचा प्रयत्न केला. धर्मवीरांची जाण ठेवत दिघेंच्या या पोरखेळाकडे शिंदेंनी दुर्लक्ष केले आहे.पण केदार दिघे हे उबाठामुळे आव्हान देऊ शकतात. ठाणे शहरात भाजपच्या संजय केळकर यांना उबाठा शिवसेनेच्या राजन विचारेंनी आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकांत नुकतेच उबाठा शिवसेनेतून फुटलेल्या नरेश म्हस्केंना महायुती विरोधात वातावरण असूनही विचारे हरवू शकले नव्हते. ठाकरेंशी प्रामाणिक असले तरीही मतदार संघातील त्यांचा संपर्क जवळपास तुटलेलाच होता. त्यात भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण व एकनाथ शिंदे यांनी स्वतःची ताकद लावली होती. आता ही निवडणूक तिरंगी होणार आहे. मनसेच्या अविनाश जाधवांनी येथून उमेदवारी दिल्यामुळे केळकरांना दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अर्थात त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांची ताकद तिथे तारून नेईल. ऐरोली मतदारसंघांत अनधिकृत झोपडपट्ट्या, जुन्या चाळी, जुन्या इमारतींचा पुनर्विकास व काही ठिकाणी नष्ट झालेली खुरटी जंगले यामुळे पसरणारे साथींचे आजार असे बिकट प्रश्न आहेत. तसेच वाहतूक समस्येबरोबर मुंबई, नवी मुंबई व ठाण्याशी वेगाने जोडले जावे यासाठी उभारल्या जाणार्या मेट्रो प्रकल्पास स्थानिकांची मनापासून साथ लाभणे असे कार्य करण्याची कसरत येथील लोकप्रतिनिधीला सातत्याने करावी लागली आहे. नवी मुंबईचे प्रस्थापित गणेश नाईक यांनी येथून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरलेला असल्यामुळे प्रश्नांची उकल कशी करायची याची कल्पना त्यांना आहे. तसेच मतदार संघात मतदारांच्या घरातच नव्हे तर मनात शिरण्याची कला त्यांच्याकडे असल्याने ते अनेक वर्षे या मतदारसंघाचे राजे बनून राहिलेले आहेत. त्यांना उबाठा शिवसेनेच्या एम. के. मडवी यांनी आव्हान दिले परंतु त्या आव्हानांत दमच नाहीये. अखंड शिवसेना असताना नाईकांनी येथून त्यांच्या उमेदवाराचा पाडव केलेला होता. आता नाईकांना समोर आव्हानच नाही असे इथले मतदार मानतात. बेलापूर हा मतदार संघ अद्याप तितकासा विकसित न झालेला परंतु बड्या शिक्षण सम्राटांचे लक्ष बनलेला आहे. नाही म्हणायला इकडे गृह संकुल आहेत. परंतु ती विखुरलेल्या स्थितीत पसरली असल्यामुळे कुणाचाही कोणाला थांगपत्ता नाही. या मतदारसंघात गणेश नाईक यांच्या कुटुंबात फूट पडून शरद पवार गटात गेलेले संदीप नाईक यांनी भाजपच्या प्रस्थापित मंदा म्हात्रे यांना आव्हान दिले आहे. म्हात्रेंचे वय झाल्यामुळे त्यांना उमेदवारी देताना भाजप पक्षाने थोडा वेळ घेतला परंतु घराघरात संपर्क असल्यामुळे मतदारांची नाडी ठाऊक असलेल्या म्हात्रेंना पुन्हा संधी मिळाली आहे. उबाठाची मते कमी करायला शिंदेंच्या शिवसेनेने येथून विजय नाहटा या भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकार्याला उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांची क्षमता दीडदोन हजार मते पळवण्यापूर्तीच आहे. फक्त होर्डिंगबाजी व चॅनल्सच्या कॅमेरासमोर उभे राहून बाइट देणे इतकेच काय ते नहाटा याचा वावर आहे.एकंदरीत ठाण्यातील बड्या व मातब्बर नेत्यांना मतदार कसा प्रतिसाद देतो त्यावर विजयाचे गणित ठरेल.