Mumbai News : मुंबईत आरटीआय कार्यकर्त्याला अटक; आंध्र प्रदेशच्या खासदाराकडून 5 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न

मुंबई : आंध्र प्रदेशच्या एका खासदाराला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून ५ कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मुंबईतून एका आरटीआय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपी रुशांत जयकुमार वाडके याला दक्षिण मुंबईतून अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्वतःला आरटीआय कार्यकर्ता म्हणवणाऱ्या वाडकेने पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका खासदाराला लक्ष्य केले. माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) अर्जांद्वारे मिळवलेली संवेदनशील माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना देण्याची धमकी त्याने दिली होती. त्या खासदारांना धमक्यांचे फोन येऊ लागल्यानंतर त्यांनी वाडकेला भेटण्यासाठी आणि वाटाघाटी करण्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकाला मेडुकुर परिसरात पाठवले.
परंतु आरोपीने चाकूचा धाक दाखवून स्वीय सहाय्यकाकडून ७०,००० रुपये रोख रक्कम लुटली. मेडुकुर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासानंतर वाडकेला अटक करण्यात आली.





