वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणात पहिली कारवाई ! 2 जणांना अटक

वरळी : आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडलेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघाताप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. वरळीतील ॲट्रीया मॉल परिसरात आज पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली आहे. या अपघातात मासे आणण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला भरधाव चारचाकीनं उडवलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.
2 जणांना अटक
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह आणि त्याच्यासोबत असलेल्या राजेंद्रसिंग बिडावत यांना पोलिसांनी अटक केली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर अखेर दोघांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार दोघांवरही गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी मिहीर शाह अद्याप फरार आहे.
काय घडले होते नेमके?
वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात मिहिर शहासोबत त्याचा चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत क्रॉफर्ड मार्केट येथून मरीनड्राइव्हहून वरळीसाठी पेडररोड मार्गे आला. नेहरू तारांगण येथील बसस्टॅापच्या विरूद्ध दिशेला असलेल्या पुनम चेंबर इमारीच्या जवळ पहाटे 5:15 वाजता हा अपघात झाला. प्रदीप नाखवा आणि मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नाखवा ह्या वरळीतील रहिवासी होते. त्यांचा मच्छीचा व्यवसाय होता. सकाळी 5:15 दरम्यान ते सीएसटीवरून मच्छी घेऊन येत असताना शहा यांच्या भरधाव बीएमडब्यु गाडीने धडक दिली. कावेरी नाखवा यांना गाडीने धडक देऊन दोन किलोमीटर लांब अंतरापर्यंत फरफटत नेले. ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. नायर रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.





