– राजेश पुरंदरे
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे. कारण या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय दिना पाटील यांनी टोपी बदलली व उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे हा मतदारसंघ मविआचा म्हणून मानला जाऊ लागला.परंतु येथील विधानसभा मतदारसंघाचे चित्र हा मनसेचा मतदार असल्याचे दिसत आहे. नाही म्हणायला सध्या भाजपाचा बोलबाला येथे फार आहे. तरीही महायुती व महाविकास आघाडी अशीच दुरंगी लढत इथे होत आहे.
मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पूर्व व घाटकोपर पश्चिम तसेच मानखुर्द शिवाजीनगर हे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा क्षेत्रात येतात. सध्याच्या राजकारणात भाजपाचे तीन, उबाठा शिवसेनेचे दोन व समाजवादी पक्षाचा एक असे सहा विद्यमान आमदार पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. पुनर्विकासाबरोबरच वाढते प्रदूषण, कायदा व सुव्यवस्था तसेच पाणीकपात हे येथील कळीचे मुद्दे आहेत; परंतु ते सोडविण्यात एकाही पक्षाला रस नाही. सर्वसामान्यांची तक्रार किरकोळ गुन्ह्यासाठी असेल तरच इथे गुन्ह्यांची नोंद होते, अशाही दैनंदिन खुमासदार चर्चा येथे झडत असतात.
घाटकोपर पश्चिममध्ये वाहतूक समस्येबरोबर नवीन रस्ते निर्माण करायला संभाव्य पुनर्विकासाचे प्रकल्प अडथळा बनत आहेत. मुंबई वाढत असताना घाटकोपरकडे झालेले दुर्लक्ष हे घाटकोपरवासीयांच्या मुळावर उठले असे म्हटले तरी गैर ठरणार नाही. भाजपच्या राम कदमांचा सुरक्षित मतदारसंघ असे समीकरण जुळले आहे. इथली दहीहंडी मोठ्या रकमाच्या बक्षिसांमुळे जगभर प्रसिद्ध असल्याने इथला गरीब मतदार हा कदमांचा भक्त बनल्याचे जाणवते. यावेळी उबाठामुळे या मतदारसंघाचे गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घाटकोपर पूर्व मतदारसंघातही भाजपचाच जोर आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकांत प्रकाश मेहता यांचा पत्ता कापून पराग शहा तेथे आले. त्यावेळी मेहता समर्थकांनी बरीच आदळआपट केली; परंतु पक्ष नेतृत्वापुढे त्यांचे काही चालले नाही. शहांनीही या मतदारसंघातील विजयाची परंपरा कायम राखत नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवला व जनताभिमुख कार्य करत मतदारांना प्रभावित केले; परंतु पाणीकपात हा मुद्दा मात्र सोडवणे त्यांनाही जमले नाही. त्यामुळे येथील भाजपचा परंपरागत मतदार नाखूश आहे.
विक्रोळी मतदारसंघ मनसे प्रभावित असून मंगेश सांगळे हा तिथला शिलेदार. पुढे स्थानिक राजकारणामुळे तिथली मनसे फुटून विखुरली गेली. काँग्रेसविरोधी कोकणी जनता तेथे असल्यामुळे शिवसेनेत जाणे बर्याच मनसैनिकांनी पसंत केले. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत तेथे परिचित असल्यामुळे आमदारकीसाठी दावा ठोकून होतेच. त्यांना त्याचा फायदा झाला. या मतदारसंघाचा ताबा त्यांनी घेतला. सध्याच्या अस्थिरतेच्या वातावरणात ते तिथले अनभिषिक्त सम्राट मानले जात आहेत. या मतदारसंघात त्यांची पाळेमुळे खोलवर रुजली गेली आहेत. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय पिसाळ हे त्यांच्याविरुद्ध लढले असते, तर तुल्यबळ लढत दिसली असती. परंतु जागावाटपात ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली आहे. त्यामुळे राऊतच इथले राजे म्हणता येईल.
भांडुप पश्चिमेचा मतदारसंघही मनसेच्याच संस्कारातील. शिशीर शिंदेंनी बांधणी केलेल्या या मतदारसंघात मनसेचे प्रशंसनीय कार्य होते. फक्त जनसंपर्क सुटला आणि मते विखुरली गेली. शिवसेनेच्या रमेश कोरगावकरांनी ही मतं एकत्र करून शिवसेनेकडे खेचली आणि 2019च्या निवडणुकीत मनसेच्याच संदीप जळगावकरांचा 25 हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. सत्तांतर काळातही उद्धव ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिल्याने उबाठा शिवसेनेने त्यांना पुन्हा नशीब अजमावण्याची संधी दिली आहे. कोरगावकरांचे कार्य विकासाभिमुख राहिल्याने भांडुपचा मतदार त्यांच्याकडे ओढला गेल्याचे शिवसैनिकांना वाटत आहे. काँग्रेसचे भाई जगतापही या मतदारसंघात लोकप्रिय असल्याने कोरगावकरांना मते खेचण्यासाठी त्यांचाही फायदा उठवता येईल.
कट्टर उद्धव ठाकरे विरोधक किरीट सोमय्या यांचा मुलुंड विधानसभा मतदारसंघ. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले मिहीर कोटेच्या विधानसभेच्या रणांगणांत पुन्हा नशीब अजमावयाला उतरले आहेत. 2019 च्या निवडणुकीत 87 हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळवत आपला या मतदारसंघातील विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांच्याकडून पराभूत झाल्याने ते विधानसभेची जागा राखतात की तीस वर्षांनी हा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटतो याचे उत्तर मतदारांकडून मिळेल. गुजराथी व मारवाडी बहुभाषिक असल्याने भाजपचा पराभव करणे काँग्रेसला जमण्यासारखे नाही.
मानखुर्द शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ गुन्हेगारीचे आगार व अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य असलेला. ‘यथा राजा तथा प्रजा’ ही म्हण या मतदारसंघात तंतोतंत लागू होते. समाजवादी पक्षाचे अबू आझमी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मविआ किंवा महायुतीतील शिवसेनेने हा मतदारसंघ काबीज करणे अशक्यप्राय बाब ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावाने थोडीफार मात करता येईल असे स्वप्न फारतर आशावादी मनाने बघता येईल; पण तेही प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता नाही.
ईशान्य मुंबईच्या या सहा मतदारसंघात सर्व लढती दुरंगीच असणार आहेत. परंतु मनसे हा मतदार फॅक्टर मते खाऊन जाणारा ठरला, तर भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेस फायदा होणार नाही. परंतु जनता ऐनवेळी कोणाच्या बाजूने रंग दाखवते हे मतदानाच्या वेळीच स्पष्ट होईल.