Mumbai News : दहिहंडीचा सराव करताना चिमुरड्या गोविंदाचा दुर्दैवी अंत

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणपती आणि दहिहंडी उत्सवाची लगबग जोरात सुरू आहे. ढोल-ताशांचे पथक गणेश आगमनाची तयारी करत असताना दहिहंडी पथकं सरावात व्यस्त आहेत. मात्र, या उत्साहाच्या वातावरणात मुंबईतील दहिसर येथील केतकीपाडा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. दहिहंडीच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातात ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे.
मृत बाल गोविंदाचे नाव महेश रमेश जाधव असे आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश आपल्या गोविंदा पथकासोबत दहिहंडीच्या सरावात सहभागी झाला होता. याचवेळी झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.
या घटनेने लहान वयाच्या गोविंदांच्या सुरक्षेची चिंता वाढवली आहे. अनेक ठिकाणी गोविंदा पथकांकडून सरावादरम्यान हेल्मेट, सेफ्टी बेल्ट किंवा खाली जाड गादी यांसारख्या मूलभूत सुरक्षा उपाययोजनांची कमतरता दिसून येते. यामुळे अशा दुर्घटना घडण्याचा धोका वाढतो.
तज्ज्ञांचे मत आहे की, दहिहंडीच्या सराव आणि स्पर्धांसाठी सरकारने कठोर सुरक्षा नियम लागू करणे आवश्यक आहे. गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. या दु:खद घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे.





